For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ganeshostav 2025 Shahupuri Yuvak Mandal: गणेशोत्सव मंडळ चालविते बालवाडी

11:27 AM Aug 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
ganeshostav 2025 shahupuri yuvak mandal  गणेशोत्सव मंडळ चालविते बालवाडी
Advertisement

मंडळाचा दरवर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, सामाजिक प्रबोधन करणारा असतो

Advertisement

By साजिद पिरजादे

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शाहूपुरी युवक मंडळाने सामाजिक कार्याचा आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. मंडळाने 1980 मध्ये बालवाडी सुरू केली आहे. उत्सवाच्या खर्चातून ही बालवाडी चालवली जाते. तसेच मंडळाचा दरवर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, सामाजिक प्रबोधन करणारा असतो.

Advertisement

शहरात 1978 मध्ये शाहूपुरी गणेश मंडळ स्थापन झाले. 1980 मध्ये मंडळाने राजर्षी शाहू बालक मंदिर नावाने बालवाडी सुरू केली. मंडळाच्या माध्यमातून आजही ही बालवाडी सुरु आहे. यासाठी येणारा संपूर्ण खर्च मंडळाच्या गणेशोत्सवातून मिळणाऱ्या निधीतून केला जातो. गणेशोत्सवात सादर होणारे पौराणिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक देखावे मंडळाचे कार्यकर्ते स्वत: तयार करतात. हे देखावे बाहेरील मंडळांना विकले जातात.

त्यातून मिळालेल्या निधीचा वापर सामाजिक उपक्रमासाठी केला जातो. गणेशोत्सव केवळ रोषणाई, देखावे आणि मिरवणुका एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता, तो सामाजिक जाणीव, पर्यावरण रक्षण आणि लोकसहभागाची जोड कशी बनू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हे शाहूपुरी युवक मंडळ होय. केवळ सेवा नव्हे, तर समाजाला दिशा देणे, हा देखील या मंडळाचा मुख्य हेतू आहे.

त्यामुळे या मंडळाचे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. तरुणांमध्ये सामाजिक जाण निर्माण होण्यासाठी हातभार लावत आहेत. महिलांना सक्षम करणे, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात हातभार लावणे ही त्यांची मुख्य उद्दिष्ट्यो आहेत. मागील अनेक वर्षांपासून मंडळाने साऊंड सिस्टीमऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करून पारंपरिकतेला पुढे नेले आहे.

त्यांच्या देखाव्यांमध्ये सामाजिक संदेश असतो. त्यामुळे सहभागी कार्यकर्त्यांची कलाकुसरही दिसून येते. गणेशमूर्तीच्या बाबतीतही मंडळाचा दृष्टिकोन पर्यावरणपूरक आहे. 10 वर्षांपासून मंडळ फायबरची मूर्ती वापरत आहे. हीच मूर्ती वर्षानुवर्षे वापरली जाते. पूजेकरिता एक फुटाची शाडूची मूर्ती स्थानिक कुंडातच विसर्जित केली जाते. सामाजिक कार्याचा वसा मंडळाकडून दरवर्षी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते.

यामध्ये गरजूंना मोफत चष्मे वाटप, औषधांचे वाटप, विशेषत: सीपीआरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी काम केले जाते. काही वेळा रेफ्रिजरेटरसुद्धा उपलब्ध करून दिला जातो. ज्यामुळे औषधे साठवणे सुलभ होते. महापालिकेच्या शाळांमध्ये तसेच सामाजिक संस्थांमध्ये मंडळाने कॉम्प्युटर्स भेट दिले.

ग्रंथालयांना, शाळा, गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. मंडळाने आजवर महिलांसाठीही विशेष उपक्रम राबवले आहेत. गरीब आणि घरकाम करणाऱ्या महिलांना दरवर्षी शिधा वाटप केला जातो. प्रधानमंत्री टीबी मुक्त योजनेतही मंडळाने सहभाग घेतला आहे.

"गणेशोत्सव साजरा करताना केवळ मोठी गणेशमूर्ती, साऊंड सिस्टीम असा वापर न करता समाज प्रबोधन करणारे देखावे आमच्या मंडळातर्फे सादर केले जातात. अशा प्रकारे सर्वच मंडळांनी प्रयत्न करायला हवा. पर्यावरण रक्षण, संवर्धनासाठी पुढाकार घ्यायला हवा."

- धनंजय दुगे, मंडळाचे कार्यकर्ते

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=w5HAWfYJxto[/embedyt]

Advertisement
Tags :

.