Ganeshotsav 2025: ज्याला वेळेचा सन्मान, त्यालाचा आरतीचा मान, छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाचा शिस्तीचा आदर्श
समाजामध्ये एक चांगला आणि सुजान नागरिक तयार व्हावा, हाच मुख्य उद्देश
By : साजिद पिरजादे
कोल्हापूर : सामाजिक भान जपणारे कोल्हापुरातील एक मंडळ म्हणजे, संभाजीनगरचे छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ. या मंडळाची स्थापना 1968 ला झाली. मंडळामध्ये धार्मिक परंपरा जोपासली जावी, यांच्याकडे तेथील लोकांचा हेतू आहे. समाजामध्ये एक चांगला आणि सुजान नागरिक तयार व्हावा, हाच मुख्य उद्देश पूर्वजांनी आणि येथील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत कायम ठेवला आहे.
निसर्गाला पूरक आणि शाडूची सव्वासात फुटाची गणेशमूर्ती हे मंडळ आणत असते. येथे गणेशाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत रोज धार्मिक कार्यक्रम होतात. त्यासाठी विशेष असे पुरोहित नेमण्यात आले आहेत. मंडळात लेझीम, झांज पथक ढोल-ताशांच्या गजरात आणि पूर्ण भक्तिभावाने श्रींचे आगमन आणि विसर्जन केले जाते.
पारंपरिक पद्धतीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला जातो. 2005 ला साऊंड सिस्टीम (डॉल्बी) चा प्रवेश झाला. साऊंड सिस्टीमचे काय दुष्परिमाण लोकांवर होतात, हे 2008 साली त्यांनी लोकांना समजून सांगितले. अनंत चतुर्दशी दिवशी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साऊंड सिस्टीम विरोधात एक मूक आंदोलन केले.
मंडळाच्यावतीने साऊंड सिस्टीम विरोधात जनजागृती केली जाते. पुराच्या काळात लोकांना मदतीचा हाथ या मंडळाने दिला, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी दुर्गम भाग होता, त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. जेणे करून रोगराईचा फैलाव होणार नाही. मंडळातर्फे अवनी संस्थेला मदत केली जाते. कोरोना काळामध्ये मृत्यूचे प्रमाण खूप वाढलेले होते तर त्याला स्मशानभूमीमध्ये शेणीचे व्यवस्था करण्यात आली.
सामाजिक कामामध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मंडळातील कार्यकर्ते कोणत्याही प्रकारची वर्गणी घेत नाहीत. भक्तांच्या दानातूनच मंडळाचा केलेला खर्च निघत असतो. मर्यादेत राहून मंडळाचे कार्यकर्ते काम करत असतात. भजन, कीर्तन, पोवाडा अशा लोप पावणाऱ्या लोककलांना प्रोत्साहन देण्याचे काम मंडळातर्फे होत असते.
छत्रपती संभाजीनगरचा कायापालट करण्यामध्ये या मंडळाच्या सामाजिक कामांचा मोठा हातभार आहे. साऊंड सिस्टीममुळे गरिबांच्या मुलांचे आयुष्य बरबाद झालेले आहे, मुलांवरती गुन्हे नोंदवले जातात आणि त्याचा परिणाम या मुलांच्या आयुष्यावर होतो. समाजातून एक प्रकारची विकृती दूर करून संस्कृती जपत या मंडळाचे काम चालत असते.
सामाजिक कामामध्ये जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग असतो. मंडप उभारण्यापासून ते विसर्जनापर्यंत तरुण अगदी उस्त्फूर्तपणे आपला प्रतिसाद देत असतात. जे मंडळाचे कार्यकर्ते बाहेरच्या गावात असतात, ते दहा दिवसाची सुट्टी काढून आपल्या श्री सेवा करतात. श्रीच्या चरणी येणाऱ्या नारळांची विल्हेवाट योग्यप्रकारे लावली जाते.
जे नारळ शिल्लक राहतात, त्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाटप केले जाते. इथून पुढे युवकांना आणि समाजाला कोणते उपक्रम उपयोगाचे ठरतात, याच्याकडे या मंडळाचे लक्ष असणार आहे.
मंडळातर्फे महिलांसाठी विशेष कार्यक्रम
महिलांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना समाजामध्ये विशेष असे स्थान मिळावे, यासाठी अनेक उपक्रम मंडळाकडून राबवले जातात. झिम्मा फुगडी, रांगोळी स्पर्धा या अशा कार्यक्रमांमुळे महिला निर्भीड बनत जातात. मंडळातून जे रक्तदान शिबिर घेतले जाते, त्यांच्यामध्ये जेवढं रक्त संकलन होते, त्यामध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त रक्त महिलांचे होते. मंडळामध्ये अभिनव असा कार्यक्रम घेण्यात येणार असून त्यामध्ये महिलांना स्तनांना कर्करोग होऊ नये म्हणून शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
आरतीला विशेष मान
मंडळामध्ये आरतीला विशेष मान दिला जातो. म्हणजे रोज रात्री आठ वाजता आरती सुरू होते, परंतु आरती करण्यासाठी कोणाचीही वाट बघितली जात नाही. आठ वाजल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला आरतीचा लाभ घेता येत नाही. या कालावधीमध्ये जी महनीय व्यक्ती असते, त्याला याचा लाभ मिळतो. या वेळेचं पालन केले नाही तर त्या व्यक्तीला परत जावे लागते.