Ganeshotsav 2025: कुरुंदवाडमध्ये सोन्याच्या गणपतीची स्थापना, श्रींच्या मूर्तीची शाही मिरवणूक
राजवाड्यातला मुख्य उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू होई
By : मानसिंगराव कुमठेकर
सांगली : गणेशोत्सवात वेगवेगळ्या गावात वैशिष्ट्यापूर्ण परंपरा आहेत. तत्कालीन कुरुंदवाड संस्थानात गणेश उत्सव हा भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होत असे. त्यावेळी देवघरात सोन्याच्या गणपतीची स्थापना होई. राजवाड्यातला मुख्य उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू होई.
त्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत गायन-वादन, कीर्तन, प्रवचन यांसह विविध धार्मिक कार्यक्रम होत असत. कुरुंदवाडमधील उत्सवात तत्कालीन अनेक नामवंत गायकांनी सहभाग घेतल्याच्या नोंदी आहेत. गणेशोत्सव हा तमाम मराठी बांधवांचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण. वेगवेगळ्या शहरांमध्ये वैशिष्ट्यापूर्ण पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो.
स्वातंत्र्यपूर्व काळात सांगली, मिरज, बुधगाव, कोल्हापूर, कुरुंदवाड, जमखंडी भोर, औंध यांसह अन्य संस्थानांमध्ये गणेशोत्सव शाही थाटामध्ये साजरा केला जात असे. या प्रत्येक संस्थानांच्या गणेशोत्सव साजरा करण्याच्या परंपरा वेगवेगळ्या होत्या. त्यांच्या नोंदी आणि छायाचित्रे आजही उपलब्ध आहेत.
सध्याच्या कोल्हापूर जिह्यातील कुरुंदवाड येथे पटवर्धन सरदारांचे वास्तव्य होते. पटवर्धन मंडळी गणेशाची निस्सीम भक्त होती. गणेश हे त्यांचे आराध्य दैवत होते. त्यामुळे त्यांच्या काळात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला जात असे.
कुरुंदवाड येथे गणेशोत्सवाची वैशिष्ट्यापूर्ण परंपरा होती. हा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होई. पहिल्या दिवशी राजवाड्यातील देवघरात गणेशाच्या सुवर्णमूर्तीची स्थापना होई. त्यानंतर 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, मंत्र पुष्प होत असत. गोंधळी व इतर लोकांची हजेरीही असे.
भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला ऐतिहासिक अशा राघवजी मंदिरातून श्री गणेशाच्या उत्सव मूर्तीची मिरवणूक निघे. ही मिरवणूक राजवाड्यापर्यंत येई. या उत्सव मूर्तीची स्थापना मखरामध्ये केली जाई. त्यासाठी सुंदर असे मखर तयार केले जात असे. याशिवाय माजघरातही एक गणेशमूर्ती स्थापन केली जाई.
यावेळी वैदिक विद्वानांकडून होम-हवन आदी कार्यक्रम होत. रात्री गणेश जन्माचे पुराण सादर केले जाई. भाद्रपद शुद्ध पंचमीला श्रींची नैमित्तिक पूजा, आरती मंत्रपुष्प गायन यांसह याज्ञीकांकडून पंचखाद्य हवन होत असे. दुपारी निमंत्रित भिक्षुक मंडळींची पंगत होई.
सायंकाळी कीर्तन आणि आणि त्यानंतर माजघरातील श्रींच्या मूर्तीची स्थापना होई. रात्री 8 वाजता मिरवणुकीने माजघरातील मूर्तीचे विसर्जन होत असे. मखरामध्ये बसवण्यात आलेल्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन मात्र पुढे भाद्रपद शुद्ध दशमीला म्हणजे अनंत चतुर्दशी दिवशी होई. राजवाड्यात गौरींचे आगमनही स्त्रियांकडून होई. त्याचीही छोटी मिरवणूक असे.
भाद्रपद शुद्ध दशमीपर्यंत राज्यातील नामांकित गायक, वादक यांच्याकडून संगीत सेवा होत असे. तसेच गोंधळी, शाहिरी यांच्याकडूनही कार्यक्रम होत असत. कीर्तन प्रवचनासाठी नामांकित प्रवचनकार, कीर्तनकार येत असत. या कार्यक्रमात उत्सवात तत्कालीन नामांकित नायकिणींची नृत्ये झाल्याच्या नोंदीही आढळतात.
भाद्रपद शुद्ध चतुर्दशी दिवशी सकाळी श्रींची पूजाअर्चा, मंत्रपुष्प, गायन व इतर नैमित्तिक कार्यक्रम होत. त्यानंतर उत्तरपूजा होई. दुपारी कुस्तीचे मैदान असे. यामध्ये अनेक नामांकित मल्ल सहभागी होत. सायंकाळी ललित आणि दरबारी मंडळी, मानकरी यांना प्रसाद देण्यात येई.
रात्री साडेसात ते साडेनऊ दरम्यान मखरात स्थापन करण्यात आलेल्या गणेशाच्या उत्सव मूर्तीची विसर्जनाची मिरवणूक मोठ्या थाटाने निघत असे. यामध्ये संस्थानचे सर्व प्रमुख मानकरी, अधिकारी सहभागी असत. यावेळी तोफांचे बार केले जात. कुरुंदवाडमधील या शाही गणेशोत्सवाची तयारी अनेक दिवस केली जात असे. या उत्सवाच्या तत्कालीन काही निमंत्रण पत्रिका मिरज संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत. त्यावरून कुरुंदवाड येथील गणेशोत्सवाच्या भव्यतेची कल्पना येते.