Ganeshotsav Gauri Aagman 2025: सोनियाच्या पावलांनी गवर आली माहेराला, आली गौराई पाहुणी
संस्कृतीची जपणूक ही स्त्रियांनी सांभाळलेली एक अलवार बाजू
By : प्रसन्न मालेकर :
कोल्हापूर : व्रतप्रिय अशा आपल्या समाजात एक फार छान गंमत आहे. पुरूष कर्तृक व्रतात विशेष असे पाठभेद बघायला मिळत नाहीत. पण, जी व्रत नारी कर्तृक अर्थात स्त्रिया करतात, त्यातील प्रथा परंपरा यातले भेद शोधायला गेलं तर एक मोठा प्रबंध तयार होईल.
संस्कृतीची जपणूक ही स्त्रियांनी सांभाळलेली एक अलवार बाजू. त्यांच्या या मायापाशातून देवही सुटत नाहीत. आणि त्यात जर ती पार्वती सारखी मानिनी देवता असेल तर काय बोलायचं? वास्तविक भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर जेष्ठा गौरीचं आगमन होतं. आता ही गौरी कोण आणि तिचं रूप कसं हे प्रांतवार निराळं असतं त्याची आपण गंमत बघू.
कोल्हापूर भागात या दिवसात येणाऱ्या तेरड्याची पूजा गौरी म्हणून होते. इथं गौरी म्हणजे गणपतीची आई, ती एकटी येत नाही तिच्याबरोबर तिची थोरली बहीण आणि धाकटी सवत गंगा येते. पाणवठ्यावर जाऊन भरलेल्या कळशीत सात खडे टाकून त्यावर चाफ्याच्या पानांनी बांधलेला तेरड्याचे डहाळे ठेवायचे.
पाणवठ्यावर पान सुपारी काकडीचे काप हळदीकुंकू वाहून वाजत गाजत घरी यायचं. ती येतानाच गाणी म्हणत खेळत येते. अपवाद म्हणून काही घरात ती तोंडांत पाण्याची गुळणी धरून मौन धरून येते. पायावर पाणी घालून ओवाळून आत घेतली की चूळ भरून बोलते.
सगळ्या घरात फिरत मग शेवटी ठरलेल्या जागी बसते तिच्या फेरीच्या मार्गावर हळदी कुंकवाचे पायाचे ठसे उठवलेले असतात. विशेषत: देशस्थ ब्राह्मण घरात सुगडाच्या गौरी असतात. त्यातली एक गौर श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारीच बसलेली असते. इतर सर्व घरात दोन्ही गौरी येतात.
गौरीचा उल्लेख बोलीभाषेत गौर किंवा गवर असा होतो. गाण्यात गवराबाई हे मुख्य पात्र. गौरी आल्या की त्यांना मिसळ पालेभाजी म्हणजे शेपू, भोपळी, चवळी, तांदळी, पातरी अशा सगळ्या पाल्याची एकत्र भाजी. फळभाजी एखादी, अळूची किंवा पाटवडी भाकरी असा शिदोरीचा नैवेद्य दाखवतात.
आमच्या ओळखीच्या एका घरी तर गौरी भाकरी खाऊन झोपवतात. आणि मग उन खाली आलं की चहापण देतात. थोडक्यात एक सासरी नांदणारी लेक माहेराला आली की काय करेल ते सगळं गौराईसाठी करायचं. अनुराधा नक्षत्रावर गौराबाई आली. सजून नटून उभी राहीपर्यंत रात्र झाली. पण डोळ्याला झोप म्हणून लागेना. कळशीच्या गौरीपासून मुखवट्याच्या गौरीपर्यंत सगळ्या सजल्या.
पोटातली गौरी असा एक प्रकार बघितला आहे. ज्यात फराळाचे पदार्थ समोर न मांडता डब्यात भरून त्यावर साडी मुखवटा सजवायचा. अशी गौरा उभी राहिली की तिच्या डोळ्यात ओढ असते ती जणू शंकरोबाची. रानोमाळ उगवलेली द्रोणपुष्पी वनस्पती म्हणजे शंकरोबा. ती सर्पविषावर औषध मानतात.
गौरी आणण्या इतका मोठा सोहळा न करता जुजबी मान घेऊन जावईबापूंना घरात घेतात. कोल्हापूर भागात शंकरोबाला धोतर फेटा असा पारंपरिक साज चढवून उभा करतात. मग सुरू होते वोवसायची गडबड. एका सुपात, दोन सुगडात देशस्थांच्या गौरीप्रमाणे तांदूळ, गहू घेऊन ते परळाने झाकतात समोर गंगा गौरी घरची सुवासिनी अशा प्रत्येकीचे 5 विडे मांडतात.
त्यावर काकडीचे काप, सुपारी ठेवून हे सूप कच्च्या सुताने सुतवतात (गुंडाळतात). असं सूतवलेलं सूप गौरीवरून ओवाळलं की वोवसा पूजन झाला. मग पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून ओटी भरतात. हा सगळा सोहळा आवरेपर्यंत दुपार होते. पण, जशी संध्याकाळ होईल तसे चेहरे खुलून येतात. संध्याकाळी ओढ लागते ती गौराबाईच्या जागरणाची....
गौरीचा संचार...
रात्रीची जेवणं झाली की हळू हळू एकमेकींना हाका घालायला सुरुवात होते. फुगडी, काथवट कणा, गाठोडे अशा लहान मोठ्या खेळांना सुरूवात होते. तोवर इकडं जाणत्या बायका कान उघडायला सुरूवात करतात. ही कान उघाडणी म्हणजे भानोरा वाजवणे.
गौरीच्या कानावरचा पदर थोडासा बाजूला करतात एका परातीवर राख किंवा रांगोळी घालून त्यावर लाकडी रवी आणि उलाथन मागं पुढं ओढतात. एक छान घुमारा घुमतो, कापूर लागतो एव्हाना झिम्म्याचे फेर गाणी टिपेला पोचतात. बारा वाजतात तसं लक्ष गौरीच्या येण्याकडे लागतं.
या खेळाचा एक मोठा भाग म्हणजे गौरीचा संचार. आणि गौर संचारते पुन्हा आगत स्वागत होतं काय ल्यालीस? कशी आलीस ? असं सगळं विचारून तिला खेळवतात. खेळता खेळता गौरी गणपती जवळचा गणोबा खेळायला आणते. गण्या फू म्हणत आपलं बाळ घेऊन खेळायला लागते.
अपत्य प्राप्तीची ओढ असणाऱ्या महिला पदर सावरून घेतात. खेळता खेळता गौरी गणोबा एखादीच्या ओट्यात घालते. जिला मिळाला ती तृप्त होते. सगळ्या सखी साजणींना उत्तरं देऊन पहाटे संचार उतरतो. दुसरा दिवस उजाडतो तोच मुळात निराश स्वर घेऊन.
दोन दिवस फुललेला गौरीचा चेहरा आज उतरलेला बघून पाय आपोआप कोनाड्यात गच्च भरलेल्या हळदीकुंकवाच्या वाट्यांकडे धावतात आणि नजर त्यावर गौरीच्या बोटांच्या खुणा शोधते. असं म्हणतात गौरा खेळत असतानाच शंकर दारात उभा असतो चल म्हणून तीचं खेळून झालं की ती जाते पहाटेच. उरते फक्त मूर्ती. मग सुरू होते दोरे घ्यायची घाई. घरच्या रितीप्रमाणे खारीक खोबरे पान भोपळ्याच फूल पान अशा वस्तूंच्या गाठी मारून दोरे घेतले जातात.
खरंतर हे व्रत तीन अष्टमीचं, भाद्रपद शु क्ल, कृष्ण आणि अश्र्विन शुक्ल तीन अष्टमीला देवीची पूजा करून घागरी फुंकायच्या आणि अश्विन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात भूमीपूजनाच्या दिवशी ते दोरे शेतात विसर्जित करायचे. सकाळी आरती झाली की वोवसा उघडला जातो.
सुगडातलं धान्य मोजून घेतलं जातं. त्याच तांदळाचा भात, त्यावर दही घालून शिदोरी बांधली जाते. दुपारची जेवणं होऊन चारची वेळ झाली की मन कातर होतं कापत्या स्वरात आरती होते. या आरतीनं जगन्नियंत्या बरोबर जोडलेला मानवी नात्यांचा बंध विरघळतो आता ते पुन्हा देव आणि आपण भक्त ! पुन्हा पुन्हा आपण म्हणत राहतो पुढच्या वर्षी लवकर या...
एवढ्या पद्धतीने सजते गौरी
1) कळशीत सात खडे तेरड्याचा डहाळे
2) लाकडी स्टॅंडवर तेरडा बांधून त्यावर एरंडाच्या पानांचा मुखवटा
3) आतमधे लोखंडी स्टॅंडवर तेरडावर मुखवटा.
4) फक्त सात खडे.
5) एका सुगडात तांदूळ दुसऱ्यात गहू त्यात हळकुंड, खारीक खोबरे, सुपारी, पैसा त्यावर झाकलेल्या परळावर नाक डोळे काढलेली गौरी.
5 अ) नवीन पद्धतीप्रमाणे मातीचे सुगड घेण्याऐवजी तांब्यांचे रंगवलेले तांबे
6) लाकडी स्टॅंडवर मुखवटे
7) लाकडी स्टॅंडवर मुखवटे कमरे पर्यंत
8) पूर्ण मूर्ती
आता या बसवण्याच्या पद्धतीत गौरीचे परिवार सदस्य वेगवेगळ्या पद्धतीने आहेत.
1) एकटी गौरी कळशीवर
2) गौरीच्याच कळशीत शंकरोबाचे डहाळे
3) गौरी शंकर स्वतंत्र कळशा
4) गंगा आणि गौरी कळशीवर
5) एकट्या गौरीचा मुखवटा
6) गौरीचा मुखवटा शंकरोबाची कळशी
7) गंगा गौरी मुखवटे
8) गौरी शंकर मुखवटे
9) गंगा गौरी शंकर मुखवटे एवढ्या पद्धतीने गौरी सजते यात आणि अनेक पद्धती आहेत.