For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ganeshotsav 2025: आठवण गडहिंग्लजच्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची

02:25 PM Sep 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
ganeshotsav 2025  आठवण गडहिंग्लजच्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची
Advertisement

मंडळाच्या स्थापनेपासूनच सामाजिक सुधारणेचा पायंडा सहाव्या पिढीकडे आजही दिसून येतो

Advertisement

By : रोहीत ताशिलदार

गडहिंग्लज : शहरात स्वातंत्र्यानंतर 1956 साली पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नेंद आढळून येते. येथील छत्रपती शिवाजी चौकातील काळभैरव गणेशोत्सव मंडळ असे मंडळाचे नाव आहे. मंडळाच्या स्थापनेपासूनच सामाजिक सुधारणेचा पायंडा सहाव्या पिढीकडे आजही दिसून येतो.

Advertisement

समाजसुधारकांची जयंती, सामाजिक परिवर्तनाचे उपक्रम, आरोग्यविषयक जागृती, तांत्रिक देखावे, कौटुंबिक नाटके आणि मनोरंजनात्मक कार्य अविरतपणे चालवलेल्या पहिल्या सार्वजनिक काळभैरव गणेशोत्सव मंडळाने यंदाही 13 फुटी गणेशमूर्तीचे दिमाखात पूजन करून पारंपरिक रूढी, परंपरा जपली आहे.

अलीकडे शहराच्या जडणघडणीत गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवाची व्याख्या बदलली असली तरी काळभैरव गणेशोत्सव मंडळांच्या जुन्या कार्यकर्त्यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटचालीवर नव्या पिढीने जाणे पसंत केले. 1956 मध्ये कै. शामराव जाधव, मुरलीधर गुरव, शिवरूद्र चव्हाण, डॉ. गणपतराव सावंत, नारायण डोमणे, बाबुराव ताशिलदार, नाना गुरव, दत्तात्रय डोमणे, शिवाजीराव खणगावे, विष्पूपंत डवरी, महादेव पाटील, शिवराम बस्ताडे, काशिनाथ पाटील, शंकरराव चव्हाण, दिनकर दड्डीकर, बाबुराव भैसकर, शंकरराव पाटील या ज्येष्ठांच्या पुढाकाराने गणेशोत्सव मंडळाचा श्रीगणेशा झाला.

सुरूवातीस काळभैरी मंदिरात श्री’ची प्रतिष्ठापना करणाऱ्या या मंडळांने अलीकडे मंडपातून उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली. 1960-70 दरम्यान उत्सव काळात पौराणिक दृश्यावर आधारीत हालता देखावा करून सीमाभागात मंडळाने गडहिंग्लजची नवी ओळख निर्माण केली. 1972 मध्ये मंडळाने गणेशाचे पूजन हत्ती, मगर, विष्णूरूपी गणेश, सुदर्शन चक्र अशा स्वरूपातील तांत्रिक देखाव्याचे पहिले दृश्य दाखवत शहरात नवा पायंडा पाडला.

आणीबाणीनंतर 1982 मध्ये मंडळाने वार्ताफलकाचे उद्घाटन करून नवी ओळख बनवली होती. याबरोबर बौध्दिक विकासाला चालना मिळण्यासाठी वाचनालयाची सुरूवात केली. रोज वर्तमानपत्रे मोफत मिळू लागल्याने बुध्दीजीवी वर्गाचा संपर्क आणि मंडळाच्या विविध कार्यात सहभाग वाढत गेला. मंडळाने गणेशोत्सवात परिसरातील नागरिक, गरजू विद्यार्थी, खेळाडूंना साहित्य वाटप करून सामाजिक जबाबदारी उचलली.

पुढे 1990 नंतर आधुनिकतेची कास धरत तांत्रिक आणि सामाजिक प्रश्नावर देखाव्याची मांडणी होत गेली. 1993, 1994, 1997, 1999 या काळात मंडळाला प्रथम क्रमांकाचे गणराया अवॉर्ड प्राप्त झाले. शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर पहिल्यांदा रायगडावरून पायी शिवज्योत आणल्याची नोंद देखील याच मंडळाच्या नावावर आहे. विविध राज्यस्तरीय व्हॉलीबॉल, कबड्डी स्पर्धा मंडळांने घेतल्या.

गेल्या 20-25 वर्षात उत्सवाला आधुनिकतेची जोड देत सदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करून सीमाभागातील जबाबदार मंडळ म्हणून मंडळाने ओळख तयार केली आहे. मंडळात सहाव्या पिढीकडे कार्यभार असला तरी पुर्वजांनी घालून दिलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, विधायक कार्याच्या पायघड्यावरच चालणे पसंद केल्याचे चित्र आहे.

"शहरातील पहिला सार्वजनिक आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून या मंडळाची ओळख आहे. ज्येष्ठांनी दाखवलेल्या आदर्शावरच आम्ही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा वसा पुढे चालवत आहोत. विधायक गडहिंग्लजकरांना आमच्या गणेशमूर्तीचे दरवर्षी विशेष आकर्षण असल्याने श्रध्देपोटी 2045 पर्यंत मूर्ती देणगीदाराची यादी तयार झाली आहे. याबरोबर शहरातील जुन्या सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन सर्वात शेवट करण्याची प्रथा आजही आम्ही ठेवली आहे."

- अमित पाटील, अध्यक्ष, काळभैरव गणेशोत्सव मंडळ, गडहिंग्लज

नवश्या गणेश’

मंडळाने 1972 साली भक्तांची मनोकामना पूर्ण व्हावी, म्हणून कै. महादेव कुंभार यांनी बनवलेल्या नवश्या गणेशमूर्तीची आजही गडहिंग्लजकरांना ओढ दिसून येते. दरवर्षी गणेश उत्सवाची सुरूवात होण्यापूर्वी याच ठिकाणी गणेशाचे पाद्यपूजन करून सणाची सुरूवात करण्याची प्रथा आहे. सध्या ती मूर्ती शहरातील काळभैरी मंदिरात ठेवली आहे. तेथे मोठ्या भक्तिभावाने भाविक आणि मंडळाकडून त्या मूर्तीची पुजा केली जाते.

Advertisement
Tags :

.