गणेश आगमन मिरवणुकीत आवाज दणाणणार! फक्त शहरात साडेतीन हजार मंडळांकडून साऊंड सिस्टीमचे बुकिंग
बाळासाहेब उबाळे/ कोल्हापूर
काही वर्षापासून आगमन मिरवणूकाही मोठ्या निघू लागल्या आहेत. शनिवारी गणेश चतुर्थी दिवशी मोठ्या धुमधडाक्यात गणेश आगमन मिरवणुका निघणार आहेत. त्यासाठी फक्त कोल्हापूर शहरातील लहान-मोठ्या जवळपास साडेतीन हजार मंडळांनी साऊंड, लाईट जनरेटरचे बुकिंग केले आहे. त्यामुळे आगमन मिरवणुकीला कोल्हापूर दणाणणार आहे.
गणेशोत्सवाच्या तयारीला महिनाभरापासून मंडळांनी सुरुवात केली आहे. पंधरा दिवसांपासून मुख्य रस्त्यासह गल्ली-बोळात मंडप उभारले आहेत. पोलीस प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे जिल्ह्यात सुमारे आठ हजार गणेश मंडळे आहेत. प्रशासनाने नुकतीच या मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन करत उत्सवात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन न करण्याचा इशारा दिला आहे. शनिवारी आगमन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमची लिटमस टेस्ट होणार आहे. या मिरवणुकीसाठी शहरातील जवळपास साडेतीन हजार मंडळांनी साऊंड, लाईट, जनरेटरचे बुकिंग केले आहे. साऊंड, लाईट, जनरेटरचे मिरवणुकीचे भाडे एक लाखाच्या आसपास जाते. साऊंड सिस्टीममध्ये दोन टॉप आणि दोन बेसला परवानगी आहे. पण प्रत्यक्ष मिरवणुकीत साऊंड सिस्टीमची किती मोठी भिंत उबारणार, हे कळणार आहे. सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मिरवणुकीला परवानगी आहे. त्याप्रमाणे चार ते पाच तास मिरवणूक सुरु राहणार आहे.
प्रशासनाच्या नियमाप्रमाणे मिरवणुकीत दोन टॉप, दोन बेस
शनिवारी गणेश आगमन मिरवणुकीसाठीच शहरातील जवळपास साडेतीन हजार मंडळांनी साऊंड सिस्टीमचे बुकिंग केले आहे. प्रशासनाच्या नियमाप्रमाणे मिरवणुकीत दोन टॉप,दोन बेस असतील. प्रशासनाला सहकार्याची भूमिका आहे.
मुनीर मुल्ला, अध्यक्ष, जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशन