बाप्पाच्या स्वागतासाठी आतुरले गणेशभक्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण!
शहरात विविध मंडळांचे आगमन सुरू! खरेदीसाठी शाहूनगरीत एकच गर्दी
सातारा प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया म्हणत शनिवार दि. 7 रोजी घराघरात गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. स्टॉलवर जावून वाजत गाजत गणरायाची मूर्ती घरी आणली जात आहे. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. गणेश मंडळांनी कुंभारवाड्यात गर्दी केली आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसापासून गणपती बाप्पाचे आगमनाचा दिवस कधी येणार अशीच चर्चा घराघरात सुरू होती. आज मात्र सर्वच गणेश भक्तांची प्रतिक्षा संपली असून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी सगळे सज्ज झाले आहे. लहान मुले, जेष्ठ मंडळी, महिला, पुरूष हे एक स्टॉलवर जावून बुक करून ठेवलेली गणपतीची मूर्ती ताब्यात घेत आहेत. सर्वच स्टॉलवर गर्दी झाली आहे. कुठे पुजा तर कुठे प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. हार, पुजेचे साहित्य खरेदीला गर्दी झालेली आहे. वाजतगाजत गणपती बाप्पाला घेवून जाण्यात येत आहे. तर काहींनी बाप्पाना घरी आणून त्यांची प्रातप्रतिष्ठापना केली आहे. मोदकाचा नैवेद्य बनवून बाप्पाच्या चरणी अर्पण केला जात आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कुंभारवाड्यात गणपती बाप्पाची मूर्ती नेण्यासाठी गर्दी केली आहे. वाहतुकीत बदल झाल्याने मोती चौक, पोवईनाका, राधिका रोड या मुख्य रस्त्यावर गर्दी अनुभवायला मिळत आहे. वाहनांची कोंडीही वाढली आहे. सर्वत्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अनुचित प्रकार होताना दिसताच तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.