गणेश विसर्जन सोहळा तब्बल 42 तासांचा
मंगलमय सोहळ्याची उत्साहात सांगता : गणेशभक्तांचा मोठा उत्साह
गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाची विसर्जनाने सांगता झाली. बेळगावमध्ये शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक रविवारी सकाळी 11.45 वाजता संपली. तब्बल 42 तास बेळगावच्या रस्त्यांवर गणेशभक्तांचा उत्साह दिसून आला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर अशा वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध होण्यासाठी महानगरपालिका, पोलीस व हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी नियोजनाप्रमाणे जबाबदारी पार पाडली. त्यामुळे निर्माल्य वेचण्यापासून ते सुरळीत वीजपुरवठा ठेवण्यापर्यंत सलग 42 तास हे काम सुरू ठेवण्यात आले. विशेष म्हणजे कपिलेश्वर येथील दोन्ही तलावांत 230 हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करून हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जन सोहळ्याची रविवारी सकाळी 11.45 वाजता सांगता झाली.
रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने सकाळपासूनच कपिलेश्वर उड्डाणपूल परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना हुसकावून लावले. लवकरात लवकर विसर्जन पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा खटाटोप सुरू होता. उड्डाणपुलावर वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी शनिमंदिरमार्गे येणारी वाहतूक रोखण्यात आली होती. विसर्जन मिरवणूक पूर्ण होताच वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पोलीस आयुक्तांनी मानले आभार
विसर्जन मिरवणूक संपताच पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी सर्वांना विसर्जन तलावावर बोलवून घेतले. जलद कृती दल (आरएएफ) ने विसर्जन मिरवणुकीवेळी महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. त्याचबरोबर सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले. महानगरपालिका व हेस्कॉमने आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडल्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.
गणेशमूर्तींच्या उंचीमुळे विसर्जनास विलंब
बेळगावमधील विसर्जन मिरवणूक यावर्षी अत्यंत शांततेत पार पडली. गणेशमूर्ती अधिक उंचीच्या असल्यामुळे विसर्जनाला विलंब होत गेला. काही मोठ्या मूर्ती कपिलेश्वर उ•ाणपुलाच्या कॉर्नरला लवकर वळल्या नसल्याने बरीच मेहनत घ्यावी लागली. तरीही पोलीस, महानगरपालिका व हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी एकत्रितरीत्या अतिशय उत्तम पद्धतीने मिरवणूक पूर्ण केली. पुढील वर्षी यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने मिरवणूक पार पाडण्यासाठी प्रयत्न करू.
- प्रकाश निकम, पोलीस आयुक्त
रविवारी सकाळी 11.45 वा. विसर्जन सोहळा समाप्त
कपिलेश्वर तलावात 230 हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन
महानगरपालिका, पोलीस, हेस्कॉमचे मोठे सहकार्य