गणेश नाईकांपुढे ऑफर अन् चॅलेंज...
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या वनमंत्री गणेश नाईक यांना आता शिंदे गटाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी सुरू झालेला हा संघर्ष काही थांबताना दिसत नाही. नाईकांनी शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनीच थेट उत्तर दिले आहे. गणेश नाईक यांना इतकी खुमखुमी असेल तर त्यांनी ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे चॅलेंजच त्यांनी दिले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या वनमंत्री गणेश नाईक यांच्यातला संघर्ष काही थांबत नाही. गणेश नाईक यांनी इतकी खुमखुमी असेल तर ठाणे वा कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवण्याचे चॅलेंजच एकनाथ शिंदेचे पूत्र खासदार श्रीकांत यांनी दिले आहे. तर दुसरीकडे गणेश नाईक यांच्या मदतीला जात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दुश्मन का दुश्मन वो अपना दोस्त याप्रमाणे नाईक यांना थेट शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. भाजपात राहून आपण एकनाथ शिंदे यांच्याविरोधात लढू शकत नाही, त्यामुळे आपल्याला स्वगृही यावे लागेल अशी ऑफरच संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला नाईक विरूध्द शिंदे संघर्ष महापालिका निवडणूका झाल्या तरी थांबताना दिसत नाही.
माझ्या नादाला लागला तर माजी खासदार कऊन टाकेन असा थेट इशाराच गणेश नाईक यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिला. नाईक विरूध्द शिंदे हा संघर्ष महापालिका निवडणुकीच्या आधीपासून सुरू झाला. महापालिका निवडणूका झाल्या महापौर बसला, मात्र हा संघर्ष काही थांबताना दिसत नाही. एकनाथ शिंदे यांचा ठाण्याच्या राजकारणात उदय होण्यापूर्वी गणेश नाईक हे ठाण्यातील राजकारणातले डॉन होते. शिंदे यांच्या अगोदर 15 वर्षे ते ठाणे जिह्याचे पालकमंत्री होते. 2014 ला नाईक यांचा भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी पराभव केला आणि 2014 ला ठाण्यातून मंत्री झालेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना ठाण्याचे पालकमंत्री पद मिळाले. ते गेल्या 15 वर्षापासून कायम आहे.
2022 ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र ठाण्यातील राजकारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे म्हणजेच ठाणे असे समीकरण झाले. 2024 ला राज्यात भाजपचा मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात शह काटशहाचे राजकारण सुरू झाले, त्यात अनेकांनी कधी स्थानिक नेत्यांवर, काहींनी थेट एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्याचे काम केले. भाजपची ताकद राज्यात चांगलीच वाढल्याने ठाण्यातील भाजपचे नेते संजय केळकर, रवांद्र चव्हाण तर दुसरीकडे नवी मुंबईतील गणेश नाईक यांनी शिंदे यांना ठाणे-कल्याणमध्येच रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शिंदे यांनी देखील थेट अमित शाह यांची भेट घेत आपली तक्रार केली, त्यानंतर स्वबळाची भाषा करणाऱ्या चव्हाण यांनी नागपूर हिवाळी अधिवेशन काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या युती म्हणूनच लढणार असल्याचे सांगितले. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या महापालिकांमध्ये भाजपला स्वबळावर लढायचे होते, मात्र यातील फक्त नवी मुंबई महापालिकेत भाजपने स्वबळावर लढत एक हाती सत्ता मिळवली. गणेश नाईक यांनी ठाण्यात देखील स्वबळावर सत्ता मिळवता आली असती मात्र ठाण्यातील भाजपचे नेते कमी पडल्याचे वक्तव्य केले होते.
एकनाथ शिंदे, गणेश नाईक, रामदास कदम, आनंदराव अडसुळ, नारायण राणे हे शिवसेनेतील कधी काळचे सहकारी, शिवसेनेत फुट पडल्यानंतर काही जण शिवसेनेत गेले तर काही जणांनी, त्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यात भाजपमध्ये गेलेल्यांमध्ये गणेश नाईक, नारायण राणे, असे अनेक नेते होते. शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने नवी मुंबईतील काही गावांबाबत त्यांनी घेतलेला निर्णय हाच या दोघांमधील संघर्षाचा पाया असल्याचे बोलले जाते.
महाराष्ट्राच्या राजकारणात काही महापालिका म्हणजे त्या तेथील राजकारण्यांना आंदण दिल्यासारख्या आहेत, वसई-विरार म्हणजे हितेंद्र ठाकुरांची, पनवेल रामशेठ आणि प्रशांत ठाकुर, नवी मुंबई गणेश नाईक, मिरा-भाईंदर नरेंद्र मेहता, मात्र यातील गणेश नाईक यांच्या नवी मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गटाने त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. ज्याच्याकडे नगरविकास खाते त्याच्याकडे महापालिकांचा कारभार, त्यामुळे शिंदे यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून नवी मुंबईवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच मग नाईक विरूध्द शिंदे संघर्ष पेटला. मग नाईक यांनी शिंदे यांना कधी रावणाची उपमा तर शिंदेंचा टांगा पलटी घोडे फरार करण्याची भाषा केली. जिल्हा परिषद निवडणुकीत सातारा पाटण येथे प्रचाराला गेलेले असताना नाईक यांनी शंभुराज देसाई यांच्याविरोधात देखील टांगा पलटी करण्याची भाषा केली, मात्र मतदारांनी भाजपचाच टांगा पलटी केला. कधी काळी नाईक यांचे नवी मुंबईवर वर्चस्व होते.
राष्ट्रवादीत असताना गणेश नाईक स्वत: आमदार राज्याचे वजनदार मंत्री ठाण्याचे पालकमंत्री, मुलगा संदीप नाईक आमदार, दुसरा मुलगा संजीव नाईक खासदार, पुतण्या सागर नाईक महापौर आणि नाईक घरातील किमान 10 ते 12 जण नगरसेवक अशा पध्दतीने नाईकांची नवी मुंबईत सत्ता होती. मात्र 2014 नंतर नाईकांच्या राजकीय वर्चस्वाला ओहोटी लागली. आज नाईक पुन्हा राजकारणात स्थिर होताना दिसत आहेत, मात्र आता त्यांना एकनाथ शिंदे यांचा मोठा अडसर ठरत आहे. 15 वर्षे ठाण्याचे पालकमंत्री असणाऱ्या नाईकांकडे कधी काळी एकनाथ शिंदे यांना निधीसाठी जावे लागायचे, ते शिंदे कालांतराने मुख्यमंत्री झाले, याचे शल्य नक्कीच नाईकांना असणार, राष्ट्रवादीत असताना शरद पवारांनी नाईकांना नवी मुंबई आंदण दिली होती. त्यामुळे नाईकांनी घरातील सगळ्यांना लाभाची पदे दिली, भाजपात मात्र घरातील एकालाच कोणाला तरी विधानसभेचे तिकीट मिळणार, मग कोण लढणार ते तुमचे तुम्ही ठरवा, असा निकष असल्याने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुलगा संदिप राष्ट्रवादीतून लढला पण मंदा म्हात्रे यांच्या विरोधात पडला, त्यामुळे दोन्ही मुले आत बाहेर आहेत.
नाईक यांच्या घरातील स्वत: नाईक यांच्यासह सर्वांच्या वाट्याला पराभव आलेला असताना, नाईक यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना माजी करण्याची भाषा करणे म्हणजे गिरे तोभी टांग उपर असेच म्हणावे लागेल. नाईक यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेला स्वत: श्रीकांत शिंदे यांनीच ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याचे चॅलेंज नाईकांना दिले आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाईक यांना जर शिंदे यांच्या विरोधात लढायचे असेल तर, त्यांनी स्वगृही यावे, शिवसेनेत नाईक आले तरच ते शिंदेना धडा शिकवू शकतात, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे गणेश नाईक हे श्रीकांत शिंदे यांचे चॅलेंज स्विकारणार की संजय राऊत यांची ऑफर हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे