For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेश जयंती विशेष : श्री वृक्षगणेश : कळंबावासियांचे श्रद्धास्थान

01:47 PM Feb 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
गणेश जयंती विशेष   श्री वृक्षगणेश   कळंबावासियांचे श्रद्धास्थान
Ganesh Jayanti Special Shri Vrikshganesh Kalamba
Advertisement

सागर पाटील कळंबा

करवीर तालुक्यातील कळंबा येथील आराध्य दैवत ‘वृक्षगणेश’ शहरापासून अवघ्या नऊ किलोमीटरवर आहे. कळंब्यानजीक कोल्हापूर-गारगोटी राज्य मार्गावर ‘झाडातला गणपती’ ही त्याची ओळख. मंगळवारी, 13 रोजी गणेश जयंती. त्यानिमित्त वृक्षगणेश मंदिरात अभिषेक, जन्मकाळ, महाआरती, महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कारही होणार आहे.

Advertisement

कळंबा पंचक्रोशीतील भाविकांचे वृक्षगणेश हे श्रध्दास्थान आहे. मंदिरामागे कळंबा तलावासभोवती दिसणारी हिरवीगार शेती अशा निसर्गरम्य वातावरणातील गणेश दर्शनाने भाविक प्रसन्न मनाने बाहेर पडतो. येथे दिवसेंदिवस कळंबा गावासह आजूबाजूच्या परिसरातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढत आहे. नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती कळंबा पंचक्रोशीत आहे. त्यामुळे संकष्टी, गणेश जयंतीसह मंगळवार, शुक्रवारीही येथे मोठी गर्दी असते. मंगळवारी गणेश जयंतीनिमित्त येथील मंदिरामध्ये जन्मोत्सव, अभिषेक, आरतीसह भजन, किर्तनादी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

कळंबा-गारगोटी रस्त्यालगत अर्जन वृक्षाच्या बुंध्यामध्ये रमेश नरके यांना गणपतीचा आकार दिसला. सुरूवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण मनामध्ये कायम गणपतीच्या आकाराबद्दल विचार येऊ लागल्याने ते अस्वस्थ झाले. त्यांनी बुंध्यातील या देवत्वाच्या आकाराचे निरीक्षण केले असता त्यात त्यांना गणेश दर्शन झाले. त्यांनी मित्र, कुटुंबीयांना याची माहिती दिली. सुरूवातीला रमेश नरके यांच्या सांगण्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. पण आपली श्रध्दा आपण जपावी, या उक्तीप्रमाणे त्यांनी ‘झाडातील गणपती’ची नित्य पूजा करण्यास सुरूवात केली.

Advertisement

दरम्यान, नरके यांची गणपतीवर निष्ठा पाहून ग्रामस्थांनाही यातील आध्यात्मिकता भावत गेली, दर्शनासाठी गर्दी वाढू लागल्याने झाडातील गणपती ‘वृक्षगणेश’ म्हणून सर्वमान्य झाला. नरके कुटुंबीयांबरोबरच ग्रामस्थ गणपतीची पूजा करू लागले. हळूहळू वृक्षगणेशाची महती सर्वदूर पसरली. त्यामुळे संकष्टी, गणेश जयंतीला येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. रमेश नरके यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू उमेश नरके यांनी येथील पूजा नियमितपणे सुरू ठेवली आहे. भाविकांसाठी येथे शेड उभारले आहे.

वृक्षगणेश मंदिरात विविध क्षेत्रातील मान्यवर दर्शनासाठी येतात. अनेकांना येथे मानसिक समाधान मिळाले. निसर्ग सानिध्यातील ‘वृक्षगणेशा’च्या दर्शनासाठी येथून प्रवास करणारेही क्षणभर थांबतात. वृक्षगणेशाची रोजची पूजाअर्चा, संकष्टी आणि गणेश जयंतीचे कार्यक्रम उमेश नरके भक्तिभावाने करतात. यामध्ये त्यांना मुलगा ओंकार याच्याशिवाय अॅड. नंदकुमार पाटील, दयानंद शिंदे सहकार्य करतात. येथे वृक्षगणेशाचे भव्य मंदिर उभारण्याचा नरके कुटुंबियांचा मानस आहे.

मंगळवारी, 13 रोजी गणेश जयंती आहे, त्यानिमित्त वृक्षगणेश मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजता महाअभिषेक, 9 वाजता होमहवन, सत्यनारायण पूजा, महाप्रसाद कार्यक्रम होणार आहेत. दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी गणेश जन्मोत्सव सोहळा आणि महाआरती होणार आहे. तरी याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन नरके कुटुंबियांनी केले आहे.

नवनिर्वाचित सदस्यांसह गुणवंतांचा सत्कार
गणेश जयंतीला सकाळी 11 वाजता भाविकांच्यावतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांसह विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी केलेल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करणाऱ्या मानवसेवा सेकंड इनिंग होम्स् संस्थेचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

महाप्रसादाचा लाभ घ्यावा : उमेश नरके
या मंदिराला 38 वर्षे पूर्ण झाली आहेत. हे 39 वे वर्ष आहे. वृक्ष गणेश मंदिरात होणारी वाढती गर्दी पाहता येथे मंदिर उभारण्याची गरज आहे. त्यानुसार नव्या मंदिर उभारण्याचा संकल्प आहे. गणेश जयंतीला होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन पुजारी उमेश नरके यांनी केले आहे.

ज्या झाडामध्ये वृक्षगणेश आहे, त्याला ‘अर्जन‘ वृक्ष म्हणून ओळखतात. त्याला धावडा, कोहा, काहू अर्जन, येराम•ाr अशीही नावे आहेत.. नदी, ओढे, झऱ्यांच्या काठावर हा वृक्ष आढळतो. त्याची साल औषधी असल्याचे सांगितले जाते. या वृक्षाला धार्मिक महत्व आहे. अनेक पौराणिक कथा या वृक्षाशी जोडल्या आहेत. भगवान विष्णू आणि श्री गणेशाला या वृक्षांची पाने वाहण्याची परंपरा आहे.

प्रमुख उपस्थिती :
गणेश जयंतीच्या कार्यक्रमाला आमदार ऋतुराज पाटील, कळंबाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सुमन विश्वास गुरव, उपसरपंच विकास पोवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट. सर्व्हंटस् बँकेचे संचालक शशिकांत तिवले, पत्रकार संपत नरके, अॅड. नंदकुमार पाटील, गर्व्हन्मेंट कॉन्ट्रॅक्टर, सिव्हील दयानंद शिंदे, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव यादव, ग्रामपंचायत कळंबे तर्फ ठाणेचे तलाठी पी. आर. ठाकूर, जायंटस् ग्रुप मेट्रो अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, डॉ. कदम मुरगुडकर कदम उपचार केंद्र, कळंबा, भिकाजी खोत, सिव्हिल इंजिनिअर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, प्रकाश आंबी चेअरमन, पाणीपुरवठा कर्मचारी, पतसंस्था, उत्तम जाधव व्हाईस चेअरमन, पाणीपुरवठा कर्मचारी, पतसंस्था, नूतन सदस्य पाणीपुरवठा कर्मचारी, पतसंस्था, श्रीकांत पाटील (चेअरमन, महालक्ष्मी विकास सेवा सोसायटी, कळंबा, मारुती गुरव, व्हाईस चेअरमन, महालक्ष्मी विकास सेवा सोसायटी,सुरेश पाटील -सरकार चेअरमन, महालक्ष्मी पाणी पुरवठा संस्था कळंबा, संभाजी तिवले (व्हाईस चेअरमन, महालक्ष्मी पाणी पुरवठा संस्था, कळंबा) सौ. दीपाली समिंदर पाटील (ग्रामपंचायत माजी सदस्या, वाशी, सुरेश हुजरे पाटील, अजिंक्य संतोष काटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात मानवसेवा सेकंड इनिंग होम्स, तबला व ढोलकी विशारद सौ. सायली सावंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत स्वरसंगम व गायक परिवार आणि डॉ. राजकुमार पोळ फौंडेशन सहकारी यांचा भाव-भक्तिगितांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 6 वाजता स्वरदर्पण प्रस्तुत गाणे मनातले भक्तीगीते हा हेमंत वाठारकर व सहकाऱ्यांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 9 वाजता सांजआरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. हे सर्व कार्यक्रम कळंबा तलाव नजीक (कोल्हापूर-गारगोटी रोड), कळंबा येथे वृक्षगणेश मंदिरात होणार आहेत.

Advertisement
Tags :

.