शहर परिसरात गणेश जयंती उत्साहात
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल : गणेश मंदिरात दर्शनासाठी गर्दी : विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
बाप्पांच्या नावाचा जयघोष, अभिषेक, काकड आरती, गणहोम, महापूजा अशा भक्तिमय वातावरणात शनिवारी गणेश जयंती उत्साहात साजरी झाली. शहर परिसरातील विविध मंदिरांतून पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शिवाय भक्तांनीही सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे गणेश मंदिरे फुलून गेली होती.
स्वयंभू गणेश मंदिर, टिळकवाडी
श्री स्वयंभू गणेश मंदिर, टिळकवाडी येथे शनिवारी गणेश जयंती उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने सकाळी 6 वाजता अध्यक्ष दामोदर भोसले यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. सर्व गणेशभक्तांच्यावतीने महागणहोम करण्यात आला. दुपारी 12 वाजता श्री गणेश जन्मोत्सव व महाआरती झाली. सायंकाळी 4 वाजता हंगरगा येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी सर्व सदस्य व भक्त उपस्थित होते.
कामत गल्ली, स्थळ देवस्थान
कामत गल्ली येथील स्थळ देवस्थानात सालाबादप्रमाणे गणेश जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम व पूजा झाली. याप्रसंगी नागरिक आणि भक्त उपस्थित होते.
हरिद्रा गणपती, सदाशिवनगर सातवा क्रॉस
सदाशिवनगर सातवा क्रॉस येथील हरिद्रा गणपती देवस्थानात गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. सकाळी अभिषेक, गणहोम, नवग्रह पूजा आणि त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी बहुसंख्य भक्तांनी याचा लाभ घेतला.
शास्त्रीनगर तिसरा क्रॉस गणेश मंदिर
शास्त्रीनगर तिसरा क्रॉस येथील श्री गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. अथर्वशीर्ष, आवर्तन, अभिषेक, पाळणा, दुर्वाचन, महाआरती करण्यात आली. यावेळी गणेश मंदिर ट्रस्टी आणि रहिवासी उपस्थित होते.
बकरी मंडई गणपती मंदिर ट्रस्ट
बकरी मंडई, गणाचारी गल्ली येथील श्री बकरी मंडई गणपती मंदिर ट्रस्टतर्फे सालाबादप्रमाणे श्री गणेश जयंतीनिमित्त महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
चन्नम्मा सर्कल गणेश मंदिर
चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. सकाळी महाभिषेक व महापूजा झाली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. सायंकाळी पाळणा झाला. त्यानंतर भजनही करण्यात आले.
सिद्धिविनायक मंदिर भेंडीबाजार
भेंडीबाजार येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा पाचवा वर्धापन दिन आणि गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. सकाळी गणहोम आणि महिलांनी पाळणा गीत सादर केले. सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
गणेश मंदिर, संभाजी रोड, खासबाग
संभाजी रोड, खासबाग येथील दगडूशेठ गणेश मंदिरामध्ये गणेश जयंती साजरी करण्यात आली. सकाळी गणेश मूर्तीवर जलाभिषेक, पंचाभिषेक घालण्यात आला. सकाळी 9 वाजता गणहोम झाल्यानंतर महिलांतर्फे पाळणा गीत सादर झाले. त्यानंतर आरती व पूजा करण्यात आली. यावेळी तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महिला मंडळ, पंच मंडळी, भक्त उपस्थित होते.
मारुती देवस्थान, वडगाव ट्रस्ट कमिटी
वडगाव येथील मारुती देवस्थान ट्रस्ट कमिटीतर्फे गणेश जयंती साजरी करण्यात आली. सकाळी कुंकुमार्चन, जलाभिषेक, पंचाभिषेक करण्यात आला. गणेशमूर्तीला हार-फुले व दागिन्यांनी सजविण्यात आले होते. सकाळी 8 वाजता गणहोम आणि दुपारी जन्मोत्सव झाला. सायंकाळी जिव्हेश्वर महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री 8 वाजता महाआरती झाल्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.