गणेश जगतापकडून मिलाद ईराण घुटन्यावर चारीमुंड्या चीत
नागराज बस्सीडोनी, तेजा दिल्ली, करण कोल्हापूर यांचे प्रेक्षणीय विजय
सांबरा बेळगाव : सांबरा येथे सांबरा कुस्तीगीर कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने श्री हनुमान मंदीर जिर्णोद्धार महोत्सवानिमित्त आयोजित भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या गणेश जगतापने ईराणच्या मिलादला आठव्या मिनिटाला घुटण्या डावावर आस्मान दाखवून उपस्थित 15 हजारहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली. प्रमुख कुस्ती राजू देसाई, नागेश देसाई, डॉ. अमित चिंगळे, इराप्पा जुई,मल्लाप्पा मोगलाई व मुकूंद मुतकेकर व कुस्तीगीर संघटना यांच्या हस्ते महाराष्ट्राचा मल्ल गणेश जगताप पुणे व आंतरराष्ट्रीय पदक विजेता मिलाद इराण यांच्यात लावण्यात आली. या कुस्तीत पहिली तीन मिनिटे दोन्ही मल्लांनी एकमेकांची ताकद आजमावली. चौथ्या मिनिटाला मिलादने एकेरीपट काढून गणेशला खाली घेण्याचा प्रयत्न केला. पण गणेशने त्यातून सुटका करून घेतली. पाचव्या मिनिटाला गणेश जगतापने एकेरीपट काढून मिलाद इराणला खाली घेत मानेचा कस काढून घुटना फिरवण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी मिलाद मानेवर फिरल्याने व दोन्ही भूजा जमिनीला न लागल्याने पंचांनी पुन्हा कुस्ती खडाखडी करण्याचा निर्णय घेतला. साहाव्या मिनिटाला पुन्हा गणेशने दुहेरीपट काढून पुन्हा मानेवर मजबूत घुटना ठेवून घुटना डावावर चीत करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली.
दोन नंबरची कुस्ती कर्नाटकाचा नागराज बस्सीडोनी व महाराष्ट्राचा ओमकार भातमारे यांच्यातील कुस्ती जयवंत बाळेकुंद्री, अमित चिंगळी, नागेश देसाई, मल्लाप्पा मोगलाई आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्याच मिनिटाला नागराजने एकेरीपट काढून ओमकार भातमारेला खाली घेत घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. त्यातून नागराजने सुटका करून घेतली. चौथ्या मिनिटाला नागराज बस्सीडोनीने एकेरीपट काढीत पायाला आकडी लावत निकाल डावावरती ओमकारला चारीमुंड्या चीत केले. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती मारिहाळ पोलिसस्थानकाचे उपनिरीक्षक शिवाजी कोळोजी व उपनिरीक्षक महंतेश नाईक यांच्या हस्ते तेजा दिल्ली व गिरीश दावणगेरी यांच्यात कुस्ती लावण्यात आली. तिसऱ्या मिनिटाला तेजा दिल्लीने गिरीश दावणगेरीला घुटना डावावर चारीमुंड्या चीत केले.
चौथ्या क्रमांकाची मेंढ्याची कुस्ती विक्रम शिनोळी व करण पुणे या कुस्तीत करणने एकचाक डावावरती फिरवताना विक्रम शिनोळीला खांद्याला दुखापत झाल्याने करणला विजयी घोषित करण्यात आले. त्याला मेंढ्याचे बक्षीस देण्यात आले. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत पृथ्वीराज कंग्राळीने रुद्राप्पा येमेटीला दोन्ही हाताचे हप्ते भरून हप्ते डावावरती चीत केले. सहाव्या क्रमांकाची कुस्ती महेश तिर्थकुंडये व सुरज चौगुले कोल्हापूर ही कुस्ती डाव-प्रतिडावाने झुंजली पण वेळेअभावी बरोबरीत राहिली. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रवीण निलजीने राज पवार कोल्हापूरचा ढाकेवर पराभव केला. कुस्ती क्रमांक आठ -निरंजन येळ्ळूर व विक्रम तुर्केवाडी, कुंस्ती क्रमांक 9 - पंकज चापगाव व शुभम तेऊरवाडी या दोन्ही कुस्त्या बरोबरीत राहिल्या. कुस्ती क्रमांक 10 - हर्ष कंग्राळीने कुबेर पिरनवाडीचा नागपट्टी डावावर पराभव केला.
सिद्धार्थ तिर्थकुंडये, मुबारक निट्टूर, भूमिपूत्र मुतगा, शिवम कडोली, श्रीकांत शिंदोळी, केशव मुतगा, बसवंत सांबरा, दर्शन सांबरा, प्रज्वल मच्छे, चेतन येळ्ळूर, ओमकार सावगाव, वेदांत मासेकर, आर्यन मुतगे, स्वप्नील मजगाव, ओमकार खादरवाडी, गोकूळ वडगाव, दिव्वेंश भाकोजी या कुस्तीपटूनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला. कुस्तीचे पंच म्हणून नवीन मुतगे, हणमंत पाटील, गणपत बन्नोशी, मुकूंद मुतकेकर, अप्पण्णा बस्तवाड, बाबू कल्लेहोळ, दुंडेश संतिबस्तवाड, गंगाराम बाळेकुंद्री, भरमा गोमाण्णाचे, रामचंद्र कडोली, कृष्णा बिर्जे, प्रकाश मजगावी, नितीन चिंगळी यांनी काम पाहिले. या कुस्तीचे समालोचन खडकलाटच्या प्रशांत चव्हाण, यल्लाप्पा हरजी यांनी केले. तर जयसिंगपूरच्या सनातन घाटगे यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या हालगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकिनांना खेळवून ठेवले.