दापोलीत गणेशमूर्ती घेऊ लागल्या आकार
दापोली :
गणेशोत्सव हा कोकणवासियांच्या चैतन्याचा, उत्साहाचा सण म्हणून पाहिला जातो. यावर्षी दोन महिन्यांवर आलेल्या गणेशोत्सवाचे वेध आतापासूनच गणेशभक्तांना लागले आहेत, गणेशचित्र शाळांमध्येही गणेशमूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. यावर्षी माती व रंगाच्या दरात वाढ अपेक्षित असल्याने गणेशमूर्तीच्या किंमतीही १५ ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
२७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. त्यामुळे गणेशचित्र शाळांमध्ये गणेशमूर्तीकारांचे हात मूर्ती घडवण्यात व्यस्त झाल्याचे पहायला मिळत आहेत. मागीलवर्षी शासनाकडून प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र मातीच्या मूर्तीच घडवण्यात आल्याचे पहायला मिळाले. आता पीओपी मूर्तीवरील बंदी उठवण्यात आली आहेत. मात्र दापोलीत बहुतांश कारखान्यात शाडू व लालमातीच्या मूर्ती अधिक प्रमाणात घडवण्यात येतात. दोन महिने शिल्लक असल्याने भक्तगण आपल्याला कोणत्या आसनावरील बाप्पाची मूर्ती हवी आहे, हे सांगण्यासाठी गणेशचित्र शाळांमध्ये मूर्तीकारांची भेट घेताना दिसत आहेत. यावर्षी मातीचे दर, रंगाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे मूर्तीची किमंतही वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
- मूर्ती घडवण्याचे काम सुरू
गणेशोत्सवासाठी दोनच महिने राहिले आहेत. त्यामुळे मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. एकंदरीत दरवर्षी माती, रंगाचे दर वाढतात. त्यामुळे काहीअंशी मूर्तीच्या दरात वाढ होणे अपरिहार्य आहे.
- आशिष गुरव, अमित गुरव, (मूर्तीकार) मुरुड