सभापतीपदी गणेश गांवकर
एल्टन डिकॉस्ता यांचा 32 विरुद्ध 7 मतांनी केला पराभव : सर्वपक्षीय आमदारांनी केले अभिनंदन
पणजी : काल गुरुवारी झालेल्या विशेष विधानसभा अधिवेशनात सभापतीपदासाठी निवडणूक होऊन त्यात अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार आमदार डॉ. गणेश गांवकर हे 32 विरुद्ध 7 मतांनी विजयी झाले. विरोधी पक्षांचे उमेदवार आमदार एल्टॉन डिकॉस्ता यांचा 25 मतांनी पराभव झाला. सभापतीपदी विराजमान होताच सर्वपक्षीय आमदारांनी त्यांचे अभिनंदन केले. तोपर्यंत उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी सभापती म्हणून कामकाज सांभाळले.
राष्ट्रीय गीताने अधिवेशनास प्रारंभ झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कामकाज सल्लागार समितीचा अहवाल विधानसभेत सादर केला आणि त्यास आवाजी मतदानाने मान्यता देण्यात आली. त्यानंतर उपसभापती डिसोझा यांनी सभापती निवडणूक घेण्याची सूचना दिली आणि त्यासाठी आलेल्या उमेदवारी अर्जांचे ठराव मांडण्यास सूचवले. त्यानुसार विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी डिकॉस्ता यांच्या नावाचा ठराव मांडला आणि आमदार व्हेन्झी व्हिएगश यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर कार्लुस फेरेरा यांनी डिकॉस्ता यांच्या नावाचा ठराव मांडल्यावर आमदार क्रूझ सिल्वा यांनी त्यास पाठिंबा दर्शवला. डिकॉस्ता यांच्या अर्जाचे दोन ठराव होते तर गांवकर यांच्या अर्जाचे पाच ठराव होते.
मुख्यमंत्र्यांकडून गांवकरांचा ठराव
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रथम गणेश गांवकर यांच्या अर्जाचा पहिला ठराव मांडला आणि त्यास पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मंत्री विश्वजित राणे, रवी नाईक, बाबूश मोन्सेरात आणि सुदिन ढवळीकर यांनी गांवकर यांच्या अर्जांचे ठराव सादर केले. त्या सर्व ठरावांना अनुक्रमे कृष्णा साळकर, रुडॉल्फ फर्नांडिस, उल्हास तुयेकर आणि प्रवीण आर्लेकर यांनी अनुमोदन दिले.
एल्टन डिकॉस्ता यांचा ठराव 32 विरुद्ध 7 मतांनी फेटाळला
हे सर्व झाल्यावर डिसोझा यांनी डिकॉस्ता यांचा ठराव मतदानास टाकला आणि ठरावास पाठिंबा देणाऱ्यांनी उभे राहाण्याची सूचना केली. तेव्हा आलेमांवसह, विजय सरदेसाई, व्हेन्झी व्हिएगश, क्रूझ सिल्वा, वीरेश बोरकर, कार्लुस फेरेरा डिकॉस्ता यांनी उभे राहून पाठिंबा दिला. ठरावाच्या विरोधातील आमदारांनी उभे राहावे अशी सूचना दिल्यानंतर सत्ताधारी, मित्रपक्षांचे मिळून 32 जण उभे राहिले. तेव्हा डिकॉस्ता यांचा ठराव 32 विरुद्ध 7 मतांनी फेटाळल्याचे आणि गांवकर हे विजयी झाल्याचे डिसोझा यांनी जाहीर केले.
गणेश गांवकर यांचा ठराव संमत
आलेमांव यांनी त्यावेळी गांवकर यांचा ठराव मतदानास टाकलाच नाही असे निदर्शनास आणून त्यावर मतदान घेण्याची सूचना केली. तेव्हा त्याची गरज नाही असे सांगून डिकॉस्ता यांचा ठराव फेटाळल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला. तथापि गांवकर यांच्या ठरावावर मतदानाचा आग्रह आलेमांव यांनी धरल्यानंतर पुन्हा मतदान घेण्यात आले आणि गांवकरांचा ठराव 32 विरुद्ध 7 मतांनी संमत होऊन ते विजयी झाल्याचे डिसोझा यांनी जाहीर केले. नंतर सावंत व आलेमांव यांनी गांवकर यांचे अभिनंदन करीत त्यांना सन्मानाने सभापतीपदाच्या खूर्चीवर बसवले तेव्हा सर्वांनी बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले.
मोदी, राधाकृष्णन यांचे अभिनंदन
सभापतीपदाची निवडणूक झाल्यानंतर उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल सी. पी. राधाकृष्णन आणि जीएसटी दरकपात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे ठराव सभापती गांवकर यांनी विधानसभेत मांडून ते मंजूर केल्याचे सांगितले.
समित्यांची पूनर्रचना
हे सर्व झाल्यावर विविध समित्यांची पूनर्रचना करण्यात आली. मुख्यमंत्री सावंत यांनी त्याची माहिती दिली. म्हादईवरील सभागृह समितीत आमदार नीलेश काब्राल यांचा समावेश करण्यात आला तर स्मशानभूमी अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी आलेक्स सिक्वेराऐवजी मंत्री माविन गुदिन्हो यांची नियुक्ती करण्यात आली. खासगी विद्यापीठ चिकित्सा समितीवर कृष्णा साळकर व आलेक्स सिक्वेरा यांना नेमण्यात आले. शेवटी राष्ट्रगीताने अधिवेशनाचा समारोप झाला. सभापती गांवकर यांचे अभिनंदन करताना ‘आप’चे आमदार व्हेन्झी व्हिएगश हे बोलतच राहिल्याने सत्ताधारी आमदारांनी तसेच सभापतींनी त्यांना आक्षेप घेऊन रोखण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.
विरोधकांच्या मागण्या अमान्य
लडाख येथे चार जणांना मारण्यात आले. त्यांच्याबाबत विधानसभेत श्रद्धांजली देण्याची मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली. रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाचा निषेध करा असे विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी सूचवले. तर ‘आप’च्या दोन्ही आमदारांनी गुन्हेगारी प्रकरणी अर्धातास चर्चेची मागणी केली. त्यांना सभापती गणेश गांवकर यांनी प्रतिसाद दिला नाही आणि मागण्याही मान्य केल्या नाहीत.
डॉ. गणेश गांवकर सभापतीपदाला योग्य न्याय देतील
डॉ. गणेश गांवकर यांची सभापती पदासाठी निवड झाल्यानंतर डॉ. सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले. ते सभापती पदाला आणि सभागृहाला योग्य तो न्याय देतील, अशी खात्री डॉ. सावंत यांनी वर्तवली.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
सर्व आमदारांना नियमांचे पुस्तक देणार
विधानसभेचे कामकाज नियमाप्रमाणे चालवणार असून सर्व आमदारांना नियमांचे पुस्तक देणार आहे. सर्वांनी राज्यातील प्रश्न अधिवेशनात मांडून ते सोडविण्याचे प्रयत्न करु या. एकटा बोलत असताना दुसऱ्याने बोलू नये.
- गणेश गावकर, सभापती
विरोधकांना पुरेसा वेळ द्यावा
विरोधकांची संख्या कमी असली तरी नवीन सभापतींनी विरोधकांना पुरेसा वेळ आणि न्याय द्यावा.
- युरी आलेमांव, विरोधी पक्षनेते
सभापतींनी नि:पक्ष राहावे
सभापतींनी पक्षपातीपणा न करता नि:पक्ष राहावे. विरोधकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेशी संधी देण्यात यावी.
विरेश बोरकर, आमदार - आरजी
पदाचे पावित्र्य राखावे
विधानसभेचे कामकाज योग्यरितीने चालवून नवीन सभापतींनी पदाचे पावित्र्य राखावे.
- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री
गणेश गावंकर उत्तम प्रशासक
गणेश गांवकर हे उत्तम प्रशासक आहेत. कामे करुन घेण्याची कला त्यांच्याकडे आहे. त्यांनी पदाचा योग्य उपयोग करावा. सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार.
- रमेश तवडकर, क्रीडामंत्री
विरोधकांचे ऐकून घ्यावे, त्यांना बोलण्याची संधी द्यावी
विरोधकांचे म्हणणे नवीन सभापतींनी ऐकून घ्यावे आणि त्यांना बोलण्याची संधी देण्यात यावी. ते खाण क्षेत्रातील असून खाणींचा प्रश्न सोडवण्यासाठी पदाचा लाभ करुन घ्यावा. तवडकर हे आता मंत्री झाल्यामुळे सभापतीपदाच्या जबाबदारीतून सुटले आहेत.
- विजय सरदेसाई, आमदार - गोवा फॉरवर्ड
विरोधकांची बाजू ऐकून घ्यावी
विरोधकांना पुरेसा वेळ देऊन त्यांची बाजू ऐकून घ्यावी. राज्यात गुन्हेगारी वाढली असून त्याबाबत अर्धा तास चर्चेसाठी द्यावा.
-व्हेन्झी व्हिएगश, क्रूझ सिल्वा, आमदार - आप