ऐन गणेशोत्सवात एलअँडटी कर्मचारी वेतनाविना
दैनंदिन जीवनात अडचणी, कंत्राटी कर्मचारी संकटात
बेळगाव : ऐन गणेशोत्सव काळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एलअँडटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. ऑगस्ट महिन्यातील वेतन बहुतांशी कर्मचाऱ्यांना मिळाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दैनंदिन गरजा भागविताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एलअँडटी कंपनीमध्ये पाणीपुरवठ्यासाठी अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र यापैकी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात वेतन वेळेत मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. ठेकेदारांनी वेळेत वेतन दिले नसल्याने कर्मचाऱ्यांना ऑगस्टच्या वेतनापासून दूर रहावे लागले आहे. एलअँडटी कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र एलअँडटी कंपनीने पाणीपुरवठ्याचे काम हाती घेतल्यापासून अनेक अडचणी वाढल्या आहेत. पाणीपुरवठ्याच्या समस्येबरोबर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे. कर्मचाऱ्यांना वेळेत आणि सुरळीत वेतन मिळत नसल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. जून दरम्यान देखील वेतन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले होते. पुन्हा ऑगस्टचे वेतन अद्याप मिळाले नसल्याची माहितीही मिळाली आहे.
येत्या दोन दिवसात वेतन देऊ!
काही कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यातील वेतन अदा करण्यात आले आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांचे वेतन देणे बाकी आहे. ते येत्या दोन दिवसात दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन सुरळीत दिले जात आहे. काही अडचणींमुळे वेतन थोडे पुढे-मागे होऊ लागले आहे.
-धीरज उभयकर (एलअँडटी मॅनेजर)