For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सव महामंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

11:48 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सव महामंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
Advertisement

विसर्जन मार्गावरील अडथळे दूर करा : रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सव मोजक्याच दिवसांवर आला असून उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन गणेश विसर्जन मार्गावरील अडथळे दूर करण्याबरोबरच विसर्जन तलावांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवाला येत्या 7 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. 11 दिवस उत्सव चालतो. दि. 17 सप्टेंबरला गणेश विसर्जन होणार आहे. शहरामध्ये 357 पेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यामुळे सदर मंडळांच्या गणेश विसर्जनासाठी उपलब्ध असणाऱ्या तलावांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात.

याबरोबरच विसर्जन मार्गावर अनेक ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर जोडण्यात आलेल्या वाहिन्या उघड्यावर आहेत. अशा धोकादायक ठिकाणांची नोंद घेऊन बंदोबस्त करण्यात यावा. विसर्जन मार्गासह शहरातील इतर भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याची डागडुजी करून रस्त्यांवरील उडणाऱ्या धुळींपासून शहरवासियांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विसर्जन तलावांच्या ठिकाणी क्रेन, पोलीस बंदोबस्त, तात्काळ सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबत लवकरच पाहणी दौरा करून समस्या निकालात काढण्यात येतील, असे सांगितले. यावेळी अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, आनंद आपटेकर, रमेश कळसण्णवर, गिरीश गौरगोंडा आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.