Sirsangi | गणेश' हत्तीचा वनविभागाला चकवा! सिरसंगी परिसरात पुन्हा एन्ट्री; ग्रामस्थांमध्ये घबराट
सिरसंगी परिसरात ‘गणेश’ हत्तीचा पुन्हा धुमाकूळ
किणे : सिरसंगी, यमेकोंड परिसरातगेल्या काही दिवसांपासून गणेश हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. शेत पिकांच्या नुकसानीसह रस्त्यालगत उभ्या करण्यात आलेल्या वाहनांचेही नुकसान केले. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बनविभागाकडून हत्ती हटाव मोहिम राबविण्यात येत होती. पण बनविभागाला चकवा देत गणेश हत्ती पुन्हा सिरसंगी परिसरात दाखल झाला आहे.
वनविभागाने हत्ती हटाव मोहिम राबविल्यानंतर हा हत्ती गेले दोन तीन दिवस अर्जुनवाडी, तळेवाडी या परिसरात थांबून होता. त्यामुळे अडकूर, राजगोळी प्रवास करीत हती कर्नाटक राज्यात निघून जाईल अशी शक्यता वनविभागाकडून व्यक्त केली जात होती. मात्र वनविभागाचा हा अंदाज फोल ठरवित हत्ती पुन्हा सिरसंगीच्याजंगलात परतला आहे.
या परिसरात हत्तीच्या झालेल्या पुनरागमनामुळे ग्रामस्थांच्या मनात पुन्हा भिती निर्माण झाली आहे. पंधरा-वीस दिवसांपूर्वी हत्तीने उग्ररूप धारण करून सिरसंगी गावात प्रवेश केला होता. त्यावेळी गावात गल्लीमध्ये रस्त्यालगत उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांची मोडतोड केली होती. त्याचबरोबर नदीकाठचे विद्युतपंप, शेतातील पत्र्याचे शेड उद्ध्वस्त केले होते. काजूच्या झाडांचे नुकसान केले होते. हत्तीचा वाढलेला उपद्रव लक्षात घेऊन माजी सरपंच सुभाष देसाईयांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देऊन हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
मंत्री मुश्रीफ यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी हत्ती हटाव मोहिम राबविण्यासाठी चर्चा केली होती. यानंतर हत्तीला हुसकावून लावण्यासाठी बनविभागाकडून गेले चार दिवस अथक प्रयत्न केले गेले. दिवस-रात्र हत्ती हटाव मोहिम राबविण्यात आली. मात्र सोमबार दि. ३० रोजी रात्री हत्तीने सिरसंगी गावच्या शिवारात प्रवेश केला. प्रकाश देशपांडे यांच्या शेतातील पाईपलाईनच्या टी, पाण्याचे प्लास्टीक बॅरेल मोडून टाकले आहेत. हत्ती हटाव मोहिम राबवून उपयोग नाही, त्यामुळे हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.