For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात गणेशोत्सवाच्या लकी ड्रॉची रंगत वाढली; कुठे BMW तर कुठे थेट 2BHK फ्लॅट बक्षीस

12:01 PM Aug 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात गणेशोत्सवाच्या लकी ड्रॉची रंगत वाढली  कुठे bmw तर कुठे थेट 2bhk फ्लॅट बक्षीस
Advertisement

मडगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील कुशावती परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या लकी ड्रॉची चुरस रंगली आहे. केपे, सांवर्डे आणि आता सांगे येथील गणेश मंडळांनी देणगी कूपनच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसांची घोषणा केली असून, कुठे महागड्या कार तर कुठे थेट 2BHK फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

Advertisement

सांवर्डे मंडळाने केली सुरुवात

या लकी ड्रॉची सुरुवात गेल्या महिन्यात सांवर्डे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली. मंडळाने देणगी कूपनवर हॅचबॅक, सेडान आणि SUV गाड्यांची बक्षिसे जाहीर केली आहेत. या ड्रॉचा निकाल 25 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

केपेमध्ये कूपनसाठी दीड किलोमीटर रांग

यानंतर केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देणगी कूपनला मोठा प्रतिसाद मिळाला. कूपन खरेदीसाठी बोरिमोल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपासून तिलामोल ट्रॅफिक आयलंडपर्यंत तब्बल दीड किलोमीटरची रांग लागल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

या ड्रॉमध्ये BMW X3 आणि 45 लाख रुपयांची रोख रक्कम ही प्रमुख बक्षिसे आहेत. याशिवाय BMW iX1, Kia Seltos आणि अन्य 14 वाहनांचा बक्षीस यादीत समावेश आहे.

सांगे मंडळाने थेट फ्लॅट उतरवले मैदानात

आता सांगे येथील सांगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बक्षिसांची कमालच केली आहे. यंदाच्या लकी ड्रॉमध्ये वाहनांसोबत थेट तीन 2BHK फ्लॅट्स बक्षीस म्हणून ठेवण्यात आले आहेत.

पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मडगावमधील पॉवर हाऊसजवळील Kayji Palladium येथे असलेला 2BHK फ्लॅट आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी फोंड्यातील कुर्टारकर नगरी येथील 2BHK, तर तिसऱ्या क्रमांकासाठी सांगेमधील नोंदुर्लीम येथील South Meadows परिसरातील 2BHK फ्लॅट देण्यात येणार आहे.

21 बक्षिसांची महाप्रसाद योजना

फ्लॅटनंतर वाहनांचीही मोठी यादी आहे. चौथ्या ते सहाव्या क्रमांकासाठी Toyota Hycross 7S, Mahindra XEV 9S आणि Tata Sierra EV देण्यात येणार आहेत.

यानंतर E-Vitara EV, Kia Seltos Diesel आणि MG Windsor Pro यांचा समावेश आहे. पुढील क्रमांकांमध्ये Tata Punch EV, Tata Tiago EV, Maruti Breeza VXi Turbo आणि Citroen C3 यांसारख्या वाहनांचा समावेश आहे.

एकूण 21 आकर्षक बक्षिसांमध्ये फ्लॅट्स, इलेक्ट्रिक SUV आणि हॅचबॅक कारचा समावेश करण्यात आला आहे.

22 ऑगस्टला कूपनचे उद्घाटन

सांगमपूर मंडळाच्या ‘महाप्रसाद’ देणगी कूपनचे औपचारिक उद्घाटन 22 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर 23 ऑगस्टपासून सांगे येथील खैरिखाटेम नगरपालिका अतिथीगृहातून कूपन विक्री सुरू होणार आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या लकी ड्रॉमध्ये वाहनांपासून थेट घरापर्यंतची बक्षिसे जाहीर झाल्याने गोव्यातील गणेशोत्सवाची रंगत आणखी वाढली आहे.

Advertisement
Tags :

.