जीवघेणी शस्त्र बाळगणाऱ्या गांधीनगरच्या तरुणाला अटक
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : कुऱ्हाड, चाकू व कोयता बाळगणाऱ्या गांधीनगर येथील एका तरुणाला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी ही कारवाई करण्यात आली असून त्याच्याजवळून दुचाकी व तीन शस्त्रs जप्त करण्यात आली आहेत. रेहान इस्माईल नदाफ (वय 20) राहणार गुलजार गल्ली, गांधीनगर असे त्या तरुणाचे नाव आहे. केए 22 एचडब्ल्यू 7215 क्रमांकाच्या दुचाकीत त्याने धारदार शस्त्र ठेवली होती. माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगोंड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील अँटी स्टॅबिंग स्क्वॉडमधील अधिकाऱ्यांनी अमीन गल्ली परिसरात दुचाकी अडवून तपासणी केली असता अधिकाऱ्यांना धक्काच बसला.
कुऱ्हाड, चाकू व कोयता घेऊन बर्गमन या दुचाकीवरून तो जात होता. कोणता तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्याने आपल्यासोबत शस्त्रs बाळगली असणार, असा संशय आहे. त्याच्यावर शस्त्रास्त्र कायदा व कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.