Crime News: नोकरच निघाला चोर, गांधीनगरातील व्यापाराचे पैस चोरणाऱ्यांना अटक
चौघांना न्यायालयात हजर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) येथील स्टेशनरी व्यापारी प्रकाश वाधवाणी यांचे पैसे चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी पकडले. यामध्ये एका अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे. हे सर्व संशयित कोल्हापुरातील असून, त्यांच्याकडून चोरीतील एक कोटी 78 लाखांची रोकड, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी व मोबाईल असा 1 कोटी 79 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते.
अटक केलेल्यांमध्ये मुख्य मास्टरमाईंड स्वरुप संजय शेळके, त्याचे साथीदार योगेश किरण पडळकर, सम्राट संजय शेळके (तिघे रा. लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर), स्वयंम सचिन सावंत (रा. बुधवार पेठ) आणि एक अल्पवयीन तरुण यांचा समावेश आहे. यातील चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस अधीक्षक गुप्ता म्हणाले, गांधीनगर येथील प्रकाश वाधवाणी हे स्टेशनरी व्यापारी आहेत. त्यांच्याकडे गेली अनेक महिने संशयित स्वरुप शेळके हा नोकरीस होता. त्यामुळे त्याला आर्थिक उलाढालीबरोबर व्यापारातील रक्कम दिवाणजी कैलास वसंत गोरड (मूळ रा. शहापूर, जि. बेळगाव, सध्या रा. गांधीनगर) कोठे ठेवतात याबाबतची माहिती होती. त्याने व्यापारी वाधवाणी यांच्या रुपयांवर दरोडा टाकण्याचा प्लॅन केला. याची माहिती त्याने मित्र योगेश पडळकर याला दिली. त्याने याची माहिती साथीदार स्वयंम सावंत, सम्राट शेळके व एका अल्पवयीन तरुणाला दिली.
कोट्यावधीची रोकड मंगळवारपेठेतून जप्त
व्यापारी वाधवाणी यांच्या कोट्यावधी रुपयांच्या रकमेवर दरोडा टाकून, संशयितांनी ती रोकड संशयित स्वयंम सावंत याच्या मंगळवार पेठेतील घरात ठेवली होती. ती रोकड पोलिसांनी जप्त केली.
कारवाईत यांचा सहभाग
या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, राजू कांबळे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, संतोष बरगे, गजानन गुरव, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, कृष्णात पिंगळे, अरविंद पाटील, अमित मर्दाने, सतिश तानुगडे, सचिन बेंडखळे व महिला पोलीस अंमलदार सायली कुलकर्णी यांनी भाग घेतला.