गांधीजींची पर्यावरण मूल्ये
2 ऑक्टोबर हा दिवस भारतभर महात्मा गांधीजींचा जयंती दिन म्हणून जसा साजरा केला जातो तसेच यादिवशी राष्ट्रीय स्तरावरती वन्यजीव सप्ताह साजरा होतो. हा केवळ योगायोग नसून, महात्मा गांधीजी यांनी, आयुष्यात जी अहिंसा, प्राणी कल्याण, नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर तसेच पर्यावरण मूल्यांना जे प्राधान्य दिले, त्यासाठी वन आणि पर्यावरण मंत्रालयाने वन्यजीव सप्ताहाचा प्रारंभ गांधी जयंतीपासून केला असावा. महात्मा गांधीजी यांनी स्वदेशी, ग्राम स्वराज्य, लघु आणि कुटीर उद्योग यांना चालना देण्यासाठी जे प्रयत्न आरंभिले, त्यामुळे हे विषय कालांतराने लोक चळवळीद्वारे जनमानसात ऊजत गेले.
यापृथ्वीवर प्रत्येक माणसाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी साधने आहेत परंतु अमर्याद लालसेची पूर्तता करणे मात्र अशक्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांनी नैसर्गिक साधन-संपत्तीची उधळण माणसाच्या अमर्याद लालसेच्या पूर्ततेसाठी करण्याला विरोध दर्शवला होता. औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमुळे माणसांच्या वाढत्या गरजेनुसार, नानाविध वस्तुंची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे शक्य झालेले असले तरी त्यांच्या अतिरिक्त उत्पादनामुळे त्याचे गंभीर दुष्परिणाम नैसर्गिक साधन-संपत्तीच्या स्रोतांवर दिसू लागलेले होते, त्याबद्दल गांधीजींनी वेळोवेळी खेद व्यक्त केला होता. त्यांनी स्वावलंबनाचे धडे, आपण हाती चरखा घेऊन सूत कातताना आणि वस्त्रs विणण्याच्या प्रक्रियेतून दुसऱ्यांना आदर्श घालून दिला. दैनंदिन जीवन जगताना वस्तुंचा, आपल्या प्राथमिक गरजांसाठी कसा नियोजनबद्ध वापर होईल, याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असायचे. आपण विणलेल्या खादीच्या वस्त्रांच्या वापराला त्यांनी प्राधान्य दिले आणि आपल्या आश्रमात आलेल्या प्रत्येकाच्या हाती चरखा देऊन, सूत कातण्याची विद्या आणि खादी वस्त्रांचा वापर अधिकाधिक कसा वाढेल, या दृष्टीने त्यांनी सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा आरंभली होती.
भारतात एकेकाळी गावोगावी सेंद्रीय शेती आणि बागायती त्याचप्रमाणे पारंपरिक उद्योग व्यवसाय करणाऱ्या कौशल्यपूर्ण कारागिर आणि कलाकार यांची जी साखळी होती आणि एकमेकांच्या समन्वयातून त्यांची नगदी पैशाच्या व्यवहाराविना जी देवाण-घेवाण चालायची, त्याचा त्यांना सार्थ अभिमान होता. एकेकाळी कुंभार, लोहार, सुतार आदी कारागिर गावोगावी कार्यरत असायचे. त्यांच्याकडून मातीची भांडी, लोखंडी विळे आणि अन्य हत्यारे त्याचप्रमाणे घराच्या छप्पराची शाकारणी करून घेताना, त्यांना शेतकरी आणि बागायतदार आपल्याकडे उत्पादीत होणाऱ्या अन्न-धान्याचा वाटा द्यायचे. गांधीजींनी आपल्या जीवनात अहिंसेच्या तत्त्वज्ञानाला विशेष महत्त्व दिले होते. त्यांच्या अहिंसेच्या विचार प्रणालीत केवळ प्राण्यांवरील अन्याय आणि अत्याचाराचा त्यांनी निषेध केला नव्हता तर वृक्ष-वेलींबरोबर कृमी-कीटक इतकेच नव्हे तर समस्त सजीवांच्या अस्तित्वाला प्राधान्य दिले होते. त्यांनी, प्राणी हत्या, देवतांना संतुष्ट करण्यासाठी क्रूररित्या दिल्या जाणाऱ्या पशुबळीच्या कुप्रथेचा विरोध केला होता. अपरिमित गरजांच्या पूर्ततेसाठी निसर्गाचे शोषण करणे, हा त्यांनी हिंसेचा प्रकार मानला होता. माणसाने आपल्यातील भोग घेण्याच्या प्रवृतीमुळे आणि भौतिक गरजांच्या वाढत्या मागण्यांसाठी नैसर्गिक साधन-संपत्तीचे जे ऱ्हासपर्व आरंभिले, त्याबद्दल त्यांना नेहमी वाईट वाटायचे आणि लालसेचे, भोग घेण्याच्या प्रवृत्तीचे निमूर्लन व्हावे, यासाठी ते सतत व्यक्तिश: प्रयत्नरत होते. आपण निसर्ग आणि संपत्तीचे मालक नसून, तिचे विश्वस्त आहोत, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे जमीन, हवा आणि पाणी यांचा वापर करताना, आपण याच तत्त्वाचे पालन करावे, असे ते मानत होते.
औद्योगिकरणामुळे उत्पादन क्षमता प्रचंड प्रमाणात वाढत असली तरी त्यामुळे हवा, पाणी, मृदा यांचे प्रदूषण कशारितीने वाढत चाललेले आहे आणि त्याच्या वाढत्या ताणाखाली परिसरातील निसर्ग आणि पर्यावरणाची जी हानी होत आहे, त्याचे त्यांना वाईट वाटायचे. त्यासाठी त्यांनी चरख्याचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबर गावोगावी शेती आणि बागायतीबरोबर लघु आणि कुटिर व्यवसाय व उद्योगांना चालना मिळावी, जेणेकरून ग्रामीण अर्थव्यवस्था सशक्त होऊन, गावांतील लोकांचे नोकरी, उद्योग-धंदे यांच्यासाठी जे स्थलांतर होत आहे, त्याच्यावरती नियंत्रण प्रस्थापित होईल, असे त्यांना वाटायचे. त्यांनी स्वच्छतेला विशेष महत्त्व देत, बऱ्याच ठिकाणी आपण झाडू हाती घेऊन गावातील गलिच्छता, रोगराई दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. केरकचरा, सांडपाणी यांची विल्हेवाट न लावल्याने आज केवळ शहरांतच नव्हे तर ग्रामीण भागातील जनतेला मलेरिया, डेंग्यु, अतिसार, आमांश आणि अन्य रोगराईची शिकार होण्याची जी वेळ आली, त्यातून त्यांची मुक्तता करण्यासाठी त्यांनी लोकसहभागातून स्वच्छतेच्या उपक्रमांना चालना दिली होती.
गांधीजी सात्विक, नैसर्गिक आणि साधा शाकाहार दैनंदिन आहारात समाविष्ट करायचे. सकाळचे नित्य क्रियाकर्मे आटोपल्यावर ते दिवसाची सुऊवात पाण्यात लिंबू आणि मध घालून निर्माण होणाऱ्या पेयाने करायचे. मोड आलेले कडधान्य, कच्च्या काकड्या, गाजर, बीट, मुळा त्याचप्रमाणे हाताने दळलेल्या ज्वारीच्या भाकरीचे त्याचप्रमाणे जेवणात भात, डाळ यांचा त्यांच्या आहारात समावेश असायचा. पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी दही, ताक यांचे सेवन करायचे. मसालेदार आणि चमचमीत पदार्थ खाण्याऐवजी मीठ, मसाला न घालता, शिजवलेला दुधी भोपळा, वांगी आदी भाज्यांचे सेवन ते करायचे. त्यांनी गाई-म्हशीचे दूध पिण्याचे सोडून, शरीरात कॅलशियम आणि प्रोटीनची कमतरता भासू नये म्हणून शेळीचे दूध यांचे सेवन करण्यास प्राधान्य दिले होते. गांधीजींनी आपल्या दैनंदिन जीवनात साध्या राहणीला आणि सामाजिक समरसतेच्या तत्त्वज्ञानाला महत्त्व दिले होते. त्यांनी अंगिकारलेल्या निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या विचारांबरोबर साधे राहणीमान यांचा स्विकार आम्ही केला तर आमचे जीवन सुंदर, सुखी आणि समृद्ध होण्यास निश्चित मदत होईल.
राजेंद्र पां. केरकर