हेल्मेट वापरासाठी पोलिसांची गांधीगिरी
खात्याच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई : हेल्मेट न वापरणाऱ्यांना जागृती फलक देऊन केले उभे
बेळगाव : हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी यासाठी गांधीगिरी केली. ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले नाही, त्यांना अडवून त्यांच्या हातात हेल्मेट वापरा, जीव वाचवा हे फलक देऊन जागृती करण्यात आली. राणी चन्नम्मा सर्कलसह शहरातील प्रमुख चौकात जागृतीची मोहीम राबविण्यात आली. प्रोजेक्ट हेल्मेटअंतर्गत पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राज अरस यांच्या मार्गदर्शनाखाली जागृतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी प्रमुख पोलीस कार्यालयांसमोर विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. येथील सीएआर, डीएआर विभागाच्या कार्यालयांबरोबरच लोकायुक्त, गुप्तचर विभाग, सीआयडी, डीसीआरई, राज्य राखीव दल, केएसआयएफएस आदी पोलीस दलाच्या विविध कार्यालयांसमोर वाहतूक पोलिसांनी मोहीम राबवली.
पोलीस दलाच्या वेगवेगळ्या कार्यालयांसमोर सोमवारी 18 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याबरोबरच पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून पब्लिक हिरो हा उपक्रमही राबविण्यात येत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या व आपल्या परिसरात सुरू असलेल्या गैरधंद्यांविषयी पोलिसांना माहिती पुरवणाऱ्यांची यादी तयार करून पोलीस आयुक्तांनी त्यांची बैठक घेतली आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या माहितीवरून कारवाई करण्यात येणार असल्याचेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.