हेल्मेट वापरासाठी पोलिसांची गांधीगिरी
खात्याच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई : हेल्मेट न वापरणाऱ्यांना जागृती फलक देऊन केले उभे
बेळगाव : हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी यासाठी गांधीगिरी केली. ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले नाही, त्यांना अडवून त्यांच्या हातात हेल्मेट वापरा, जीव वाचवा हे फलक देऊन जागृती करण्यात आली. राणी चन्नम्मा सर्कलसह शहरातील प्रमुख चौकात जागृतीची मोहीम राबविण्यात आली. प्रोजेक्ट हेल्मेटअंतर्गत पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राज अरस यांच्या मार्गदर्शनाखाली जागृतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी प्रमुख पोलीस कार्यालयांसमोर विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. येथील सीएआर, डीएआर विभागाच्या कार्यालयांबरोबरच लोकायुक्त, गुप्तचर विभाग, सीआयडी, डीसीआरई, राज्य राखीव दल, केएसआयएफएस आदी पोलीस दलाच्या विविध कार्यालयांसमोर वाहतूक पोलिसांनी मोहीम राबवली.
प्रोजेक्ट हेल्मेटसंबंधीचा जागृतीचा एक भाग म्हणून कार्यालयात प्रवेश करताना विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस दलासंबंधीच्या कार्यालयांसमोर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. वाहतूक विभागाचे एसीपी जोतिबा निकम, दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. प्रमुख चौकामध्ये विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्या हातात जागृतीचा फलक देण्यात आला. हेल्मेट वापरा नहून माझ्यासारखेच तुम्हालाही जागृतीत भाग घ्यावे लागणार, असा तो फलक होता. प्रोजेक्ट हेल्मेटबरोबरच पार्किंगला शिस्त लावण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. सोमवारी दुपारी काकतीवेस रोडवर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली. समविषम पार्किंग व्यवस्थेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा प्रयत्न सुरू केला आहे. मध्यंतरी ही व्यवस्था सुरू होती. पाठपुरावा थांबल्यामुळे पुन्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूने पार्किंग सुरू झाले. याबरोबरच वेगवेगळ्या आस्थापनांसमोर ठेवलेले मोठे फलकही वाहतूक पोलिसांनी गोळा केले आहेत. दुकानांसमोर फलकांमुळे वाहतुकीला व्यत्यय होऊ नये म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पब्लिक हिरो उपक्रम
पोलीस दलाच्या वेगवेगळ्या कार्यालयांसमोर सोमवारी 18 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याबरोबरच पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून पब्लिक हिरो हा उपक्रमही राबविण्यात येत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या व आपल्या परिसरात सुरू असलेल्या गैरधंद्यांविषयी पोलिसांना माहिती पुरवणाऱ्यांची यादी तयार करून पोलीस आयुक्तांनी त्यांची बैठक घेतली आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या माहितीवरून कारवाई करण्यात येणार असल्याचेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.