पणजीत 2 ऑक्टोबरपासून गांधी शिल्प बाजार; देशभरातील हस्तकला वस्तूंची पर्वणी
पणजी : गोवा खादी ग्रामोद्योग मंडळ आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने पणजीतील कला अकादमीच्या दर्यासंगम येथे 2 ते 11 ऑक्टोबरदरम्यान दहा दिवसांच्या गांधी शिल्प बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. या बाजारात देशातील विविध राज्यांतील कारागीर सहभागी होणार असून त्यांच्या हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री केली जाणार आहे.
या बाजाराचे उद्घाटन 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा बाजार नागरिकांसाठी खुला राहणार असून प्रवेश सर्वांसाठी मोफत आहे.
गांधी शिल्प बाजाराच्या निमित्ताने विविध राज्यांतील कारागीर गोव्यात येणार आहेत. त्यांच्या पारंपरिक हस्तकला वस्तू, कलाकुसरीच्या विविध वस्तू आणि इतर उत्पादनांचा अनुभव घेण्याची तसेच खरेदी करण्याची संधी गोमंतकीय नागरिकांना मिळणार आहे.
देशातील विविध राज्यांतील हस्तकलेचे वैविध्य एकाच ठिकाणी पाहता येणार असल्याने हा बाजार हस्तकला प्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. विविध राज्यांतील कारागीर आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन करून त्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहेत.
कारागीरांना बाजारपेठ आणि व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काही उत्पादनांवर विशेष सवलतीही उपलब्ध होणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने गांधी शिल्प बाजाराला भेट देऊन कारागिरांच्या हस्तकला उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.