For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गांधी देशविरोधी शक्तींचे ‘बाहुले’

12:36 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
गांधी देशविरोधी शक्तींचे ‘बाहुले’
Advertisement

भाजपचा पलटवार, काँग्रेसने नेहमी केली तडजोड

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारतविरोधी शक्तींच्या हातातील बाहुले आहेत, असा पलटवार भारतीय जनता पक्षाने केला आहे. तसेच, काँग्रेसचा इतिहासच दबावाखाली येऊन तडजोडी करण्याचा आहे, असाही घणाघात केला या पक्षाने केला आहे. मंगळवारी मध्यप्रदेशात राहुल गांधी यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘तडजोड करणारे नेते’ असा आरोप केला होता. भारतीय जनता पक्षाने बुधवारी गांधी यांच्या या आरोपला प्रत्युत्तर देताना काँग्रेसवर आरोप केले.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेने व्यापार करार करण्यासाठी दबाव आणला असून ते या दबावाला बळी पडले आहेत. अदानी आणि एपस्टिन फाईल्स ही कारणे पुढे करुन हा दबाव आणण्यात आला आहे, असा आरोप गांधी यांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेशी व्यापार करार रद्द करावा आणि आपण दबावाखाली नाही हे सिद्ध करावे, असे आव्हान गांधी यांनी दिले होते.

गांधी यांचे देशविरोधी शक्तींशी संबंध

भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी राहुल गांधी यांच्यावर प्रत्यारोपांचा भडिमार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारतात घडत असलेली प्रगती राहुल गांधी यांना सहन होत नाही. भारताचे वाढत असलेल्या सामर्थ्य त्यांना पहावत नाही. त्यामुळे ते बेताल बोलत आहेत. भारताचा आणि अमेरिकेचा करार भारतासाठी लाभदायक आहे. अद्याप या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या नाहीत. परंतु गांधी यांना याचे भान नाही. ते यांत्रिकपणे केंद्र सरकारवर आरोप करतात. त्यांचा प्रत्येक आरोप खोटा ठरलेला आहे, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी दिले.

तिबेट घातला चीनच्या घशात

गांधी कुटुंबाने स्वत:चे हित सुरक्षित करण्यासाठी नेहमीच विदेशी शक्तींसह तडजोड केली आहे. हे प्रकार अगदी नेहरुंच्या काळापासून घडत आहेत. नेहरुंच्या काळात सीआयए या गुप्तचर संस्थेचा भारतात मुक्तसंचार घडत होता. अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थानी इंदिरा गांधी यांनाही साहाय्य केले होते. स्वत: राहुल गांधी विदेशात जाऊन भारताच्या विरोधात विधाने करतात. ही कृती ते विदेशी भारतविरोधी शक्तींच्या आहारी जाऊन करतात. भारताचे 45 कोटी लोक हे माझ्यावरचे ओझे आहेत, असे नेहरु म्हणत असत. 1954 मध्ये नेहरुंनी तिबेटवरचा भारताचा अधिकार सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे तिबेट अपोआप चीनच्या घशात गेला. त्यांनी चीनच्या दबावाखाली मान झुकविली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी चीनच्या दबावाखाली येऊन चीनशी गुप्त करार केला. त्यासंबंधी त्यांनी आजही माहिती दिलेली नाही. काँग्रेसच्या ‘राजीव गांधी न्यास’ या संस्थेला चीनकडून अर्थपुरवठा केला गेला आहे. यामुळे हे दोन्ही नेते चीनच्या दबावाखाली आहेत, असा घणाघात नितीन नबीन यांनी केला.

राहुल गांधी यांचे गुप्त दौरे

राहुल गांधी विदेशी दौऱ्यांवर जातात तेव्हा सुरक्षा व्यवस्थेला अंधारात ठेवतात. ते कोठे जातात आणि काय करतात यासंबंधी इतकी गुप्तता का पाळली जाते ? ते भारत विरोधी शक्तींशी तडजोड करण्यासाठीच विदेशी जातात. ही महिती भारतीय लोकांना कळू नये, म्हणून या भेटी गुप्त ठेवल्या जातात. गांधी यांचा संपूर्ण राजकीय कार्यकाळच गुप्त दौऱ्यांनी व्यापलेला आहे, असा घणाघात त्यांनी केला.

दोन्ही पक्षांमध्ये शब्दयुद्ध

सध्या भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात शब्दयुद्ध भडकले आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत गांधी यांनी मुख्य विषय सोडून भारत-चीन संघर्षाचा मुद्दा उकरुन काढला. तथापि, एक इंचही भूमी चीनला घेऊ दिलेली नाही. असे स्पष्टीकरण माजी भूसेना प्रमुख नरवणे यांनी केल्याने आरोपातील हवा गेली होती.

Advertisement
Tags :

.