‘गांधी भारत’ कार्यक्रम यशस्वी करणार
मंत्री एच. के. पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती : वर्षभर शताब्दी महोत्सव साजरा होणार
बेळगाव : महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. गांधीजींची तत्त्वे-धोरणे आणखी प्रचलित करण्यासाठी, तसेच गांधीजींचे विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी ‘गांधी भारत’ कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती कायदा आणि संसदीय व्यवहार-पर्यटन विकासमंत्री एच. के. पाटील यांनी दिली. येथील सरकारी विश्रामगृहात मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कार्यक्रम वैशिष्ट्यापूर्ण, रचनात्मक होण्यासाठी गांधीवादी, वरिष्ठ मंडळी यांच्याशी चर्चा करून अधिवेशनाच्या इतिहासाला उजाळा देणे व त्याचे महत्त्व पटवून देणे, हा शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा उद्देश आहे.
अधिवेशनाला साक्षीदार ठरलेल्या स्थळांना भेट देणे व सखोल चर्चा करून कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले 2 ऑक्टोबरपासून वर्षभर शताब्दी महोत्सव साजरा होईल. महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व मिळवून देण्यासाठी विधीमंडळाचे संयुक्त अधिवेशन घेणे व अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना निमंत्रित करण्याचा विचार आहे. गांधीजींसंबंधी विशेष अभिमान असलेले बराक ओबामा यांनी संयुक्त अधिवेशनाला उद्देशून भाषण करावे, असा विचार अनेकांचा आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अलीकडेच बराक ओबामा यांना निमंत्रण पत्र पाठविले आहे. डिसेंबर 26, 27 किंवा जानेवारी 2025 ते ऑक्टोबर 2025 पूर्वी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संयुक्त अधिवेशन बेळगावातच
काँग्रेस अधिवेशनाची शताब्दी साजरी करण्यासाठी सरकार 25 कोटी रुपये निधी देणार असून आवश्यकता भासल्यास अतिरिक्त अनुदानही देणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. काँग्रेस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कलाकारांचे एक विशेष नाटक तयार करण्यात यावे, अशी सूचना एच. के. पाटील यांनी केली. याशिवाय अधिवेशन स्थळावर महात्मा गांधीजींचे स्मारक, छायाचित्र, वस्तू प्रदर्शन व कायमस्वरुपी वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यात यावे, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सर्जु काटकर, देशपांडे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मराठे, निलेश बेनाळी आदींनी काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी महोत्सव सुनियोजितपणे होण्यासाठी सल्ला-मार्गदर्शन केले. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, काँग्रेस अधिवेशन शताब्दी महोत्सव समितीचे मानद अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री विराप्पा मोईली, तसेच समितीचे राज्य संचालक व विधान परिषद माजी सभापती बी. एल. शंकर, सदस्य एन. आर. विशुकुमार, आमदार असिफ (राजू) सेठ आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
वीरसौध, काँग्रेस विहिरीची मान्यवरांकडून पाहणी
बेळगावातील काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर उपस्थित मान्यवरांनी टिळकवाडीतील वीरसौधला भेट दिली. यावेळी छायाचित्र प्रदर्शन व काँग्रेस विहिरीची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर लेले मैदान, सीपीएड् मैदान, कणबर्गी येथील गंगाधरराव स्मारक, तसेच हुदली येथील महात्मा गांधी स्मारकाला भेट दिली. यावेळी मंत्री एच. के. पाटील, पालकमंत्री जारकीहोळी, माजी मंत्री विराप्पा मोईली, विधान परिषद माजी सभापती बी. एल. शंकर, एन. आर. विशुकुमार, आमदार असिफ सेठ, विनय नावलगट्टी, शिवनगौडा पाटील, रमेश जनगल, रामकृष्ण मराठे आदी उपस्थित होते.