ग्रामीण भागात गणरायांचे उत्साहात स्वागत
सार्वजनिक मंडळांच्या गणरायांचे रात्री उशिरापर्यंत आगमन : महाआरतीसह फटाक्यांची आतषबाजी
वार्ताहर/धामणे
ग्रामीण भागात गणरायांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. धामणे, नंदिहळ्ळी, देसूर, राजहंसगड, सुळगा (ये), नागेनहट्टी येथे गणेश चतुर्थीनिमित्त शनिवार दि. 7 रोजी सकाळपासूनच घरगुती गणपती मूर्तींच्या आगमनाला ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत करत प्रत्येक गावातील गणेशभक्त गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आपापल्या घरात गणपती घेवून जात होते. गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यात आपापले गणपती आणण्यासाठी प्रत्येक घरातील पुरुष भक्तांबरोबर महिलाभक्तही सहभागी झाल्या होत्या.
घरातील गणपती आपापल्या सोयीनुसार कोणी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून तर कोणी डोकीवरुन, कोणी रिक्षातून उत्साही वातावरणात आणत होते. सकाळपासूनच पावसाने उघडीप दिल्याने धामणे, नंदिहळ्ळी, देसूर, राजहंसगड, सुळगा (ये.), नागेनहट्टी या भागात यंदाच्या गणपती उत्सवाला उत्साहाने सुरुवात झाली आहे. दिवसभर घरगुती गणपती आपापल्या घरात स्थापना करून झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजल्यानंतर सार्वजनिक मंडळांचे गणपती आणण्याच्या तयारीत कार्यकर्ते होते. या भागातील सार्वजनिक मंडळांच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात येवून रात्री उशिरापर्यंत मंडळांच्या गणपतींचे पूजन सुरू होते.