गेमचेंजर चित्रपट प्रदर्शित
राम चरण आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट गेम चेंजर हा यंदाच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी याचा ट्रेलर सादर केला आहे. या चित्रपटाद्वारे शंकर हे तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. चित्रपटात रामचरण दुहेरी भूमिकेत आहे. यातील एक भूमिका न्यायासाठी लढणारी तर दुसरी आयएएस अधिकाऱ्याची आहे. तर कियाराने यात त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.
राम चरण या चित्रपटात एका भ्रष्ट मुख्यमंत्र्याचा पर्दाफाश करताना दिसून येणार आहे. आरआरआरनंतर राम चरणला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. गेम चेंजरचे चित्रिकरण 2021 मध्ये सुरू झाले होते, परंतु ते दीर्घकाळ चालल्याने याच्या प्रदर्शनाला विलंब झाला. चित्रपटाची कहाणी सुब्बाराज यांनी लिहिली असून साई माधव बुर्रा यांनी संवादलेखन केले आहे. चित्रपटात रामचरण, कियारासोबत अंजली, एसजे सूर्या, श्रीकांत, समुथिरकानी, सुनील, नवीन चंद्रा हे कलाकार दिसून येतील. या चित्रपटाची निर्मिती श्री वेंकटेश्वर क्रिएशन्स, दिल राजू प्रॉडक्शन्स आणि झी स्टुडिओजकडून करण्यात आली आहे.