For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळ जुनाच ओळख नवी !: ‘स्केलेटन’

06:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेळ जुनाच ओळख नवी    ‘स्केलेटन’
Advertisement

‘स्केलेटन रेसिंग’ म्हटल्यानंतर हे आणखी काय असा प्रश्न कित्येकांना पडेल...त्यात एका लहान ‘स्लेड’ म्हणजे पट्टीवरून घसरणीच्या बर्फाळ ट्रॅकवर सुसाट सुटायचे असते ते उताणे झोपून. ‘ल्यूज’ आणि यात महत्त्वाचा फरक तो हा. ‘स्केलेटन’ हा जगातील पहिला ‘स्लायडिंग स्पोर्ट’ मानला जातो...

Advertisement

  • 19  व्या शतकात स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्झ शहरात या खेळाचा उगम झाला असं मानलं जातं. सदर स्विस रिसॉर्ट शहरात तो श्रीमंतांचा खेळ म्हणून विकसित झाला. 1905 मध्ये स्वित्झर्लंडच्या बाहेर पहिली स्पर्धा स्टायरिया, ऑस्ट्रिया इथं झाली...
  • असं मानलं जातं की, ‘स्लेड’च्या स्वरुपामुळं या खेळाला ‘स्केलेटन’ हे नाव मिळालं. या क्रीडाप्रकाराची जागतिक प्रशासकीय संस्था ‘आंतरराष्ट्रीय बॉबस्ले आणि स्केलेटन महासंघ’ आहे...
  • ‘स्केलेटन रेसिंग’ हा सध्या हिंवाळी ऑलिम्पिकचा भाग असून 1928 आणि 1948 च्या हिंवाळी खेळांत तो झळकला होता. या दोन्ही स्पर्धा सेंट मॉरिट्झ इथंच झाल्या होत्या. त्यानंतर 2002 मधील सॉल्ट लेक सिटी इथं झालेल्या हिंवाळी ऑलिम्पिकमध्ये त्याचं पुनरागमन होऊन पुऊष नि महिलांच्या गटात स्पर्धा झाल्या...
  • ‘बॉबस्ले’ नि ‘ल्यूज’च्या लोकप्रियतेसमोर हा प्रकार मध्यंतरी मागं पडला होता. मात्र 70 च्या दशकाच्या मध्यापर्यंत काही बदल करण्यात येऊन ‘स्केलेटन’ खेळ पुनरुज्जीवित करण्यात आला अन् 1987 पर्यंत जागतिक स्पर्धा तसंच ‘वर्ल्ड कप चॅम्पियनशिप’ची सुरुवात झाली...
  • ‘स्केलेटन’मध्ये पुरुष व महिला अशा दोन गटांत स्पर्धा होतात. ‘स्केलेटन’ हा एक वैयक्तिक खेळ. यामध्ये फक्त एकच रायडर शर्यतीत उतरतो...
  • या खेळात सहभागी होणाऱ्यांना खास हातमोजे, एल्बो पॅड्स, शूज, पोशाख परिधान करावा लागतो. जोडीला ‘हेल्मेट’. तो एक आवश्यक भाग. कारण त्यामुळं डोके, मान आणि चेहऱ्याला सुरक्षा मिळते...
  • ‘स्केलेटन’ हा थोडा धोकादायक, पण साहसी खेळ. कारण त्यात वापरली जाणारी ‘स्लेड’ प्रचंड वेग गाठू शकते. क्रीडापटू सहसा त्याचे पोट तळाशी टेकवून झोपतात अन् शक्य तितक्या लवकर संपूर्ण ‘ट्रॅक’ पार करण्याचा प्रयत्न करतात...
  • ‘स्केलेटन रेसर’ सुरुवातीला ‘स्लेड’ला ढकलतो आणि ‘स्लेड हँडल’ला पकडून अंदाजे 50 मीटर्स अंतरापर्यंत शक्य तितक्या वेगानं धावत ताशी 40 किलोमीटरांपर्यंतची गती गाठतो...त्यानंतर तो ‘स्लेड’वर सूर मारून सुसाट सुटतो. ‘एअरोडायनेमिक’ कारणापोटी ‘रेसर’ दोन्ही हात शरीराच्या बाजूला घट्ट ठेवतो...
  • ‘स्लेड’ला पाय व खांद्यांच्या हालचालेंचा वापर करून हाकलं जातं, जे त्याची दिशा बदलण्यास मदत करतं. त्यावर ‘रेसर’ ताशी 150 किलोमीटर्सपर्यंत वेग गाठू शकतो...
  • ‘स्केलेटन रेस’ कृत्रिम बर्फाळ ट्रॅकवर होते, ज्याचा वापर ‘बॉबस्लेडिंग’ आणि ‘ल्यूज रेस’साठीही केला जातो. हे ट्रॅक ‘काँक्रीट’ने बांधलेले असतात आणि त्यावर बर्फाचे थर टाकले जातात. स्पर्धांपूर्वी ट्रॅक थंड करण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘रेफ्रिजरेशन’ केलं जातं. याला अपवाद स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्झच्या ट्रॅकचा, तो निसर्गत: थंड राहतो...
  • रेस डायरेक्टर, चार ते सहा पंच, चेअरपर्सन, टाईमकीपर अन् तांत्रिक प्रतिनिधी मिळून या प्रकारातील शर्यतींचं कामकाज हाताळतात...

- राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.