खेळ जुनाच ओळख नवी ! किकबॉक्सिंग
06:00 AM Nov 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
किकबॉक्सिंग हा इतर मार्शल आर्ट्सप्रमाणं प्रतिर्स्ध्याला पूर्णपणे भिडून खेळायचा खेळ. त्याला वेगळं ठरवितं ते ‘किकिंग’ आणि ‘पंचिंग’चं मिश्रण. त्यादृष्टीनं या खेळानं ‘कराटे’ आणि पाश्चिमात्य ‘बॉक्सिंग’कडून प्रेरणा घेतलीय...‘किकबॉक्सिंग’ची वाट अनेकांकडून धरली जाते ती केवळ स्वसंरक्षणासाठी नव्हे, तर एक खेळ म्हणूनही...
Advertisement
- किकबॉक्सिंग ही विविध पारंपरिक शैलींच्या संयोगातून निर्माण झालेली संकरित ‘मार्शल आर्ट’ मानली जाऊ शकते...हा प्रकार अधिक लोकप्रिय करण्यात मोलाची भूमिका बजावलीय ती व्हॅन डॅम, स्कॉट अॅडकिन्ससारख्या कलाकारांच्या हॉलिवूडपटांनी...
- या प्रकाराचा उगम 50 च्या दशकात झाला तो जपानमध्ये...त्याची लढत ‘बॉक्सिंग’ रिंगणात होते. सामान्यत: बॉक्सिंग ग्लोव्हज, माउथ गार्ड्स, शॉर्ट्स परिधान करून आणि किक हाणण्यास सोपं जात असल्यानं अनवाणी पायांनी खेळाडू उतरतात...
- ‘किकबॉक्सिंग’ नियम भिन्न-भिन्न आहेत. ‘अमेरिकन किकबॉक्सिंग’मध्ये खेळाडू प्रतिस्पर्ध्यावर पंच, किक आणि कंबरेच्या वर प्रहार करू शकतो. मात्र कोपर आणि गुडघे वापरण्याची परवानगी नसते. ‘क्लिंच फाईटिंग’, ‘थ्रो’ आणि ‘स्वीप’ यांना देखील परवानगी नसते...
- एका लढतीत साधारणपणे 3 ते 12 फेऱ्या असतात. प्रत्येक फेरी दोन किंवा तीन मिनिटं चालते आणि प्रत्येक फेरीमागं एक मिनिट विश्रांती दिली जाते...
- ‘किकबॉक्सिंग’मध्ये ‘बेल्ट’ व्यवस्थेचे सहा स्तर आढळतात. परिपूर्ण तंत्रांसाठी दिला जाणारा सर्वांत उच्च म्हणजे ‘क्यू तपकिरी’ पट्टा, दुसऱ्या क्रमांकावर निळा पट्टा, तिसरा हिरवा, चौथा नारिंगी, तर पाचवा पिवळा पट्टा. सहावा पांढरा पट्टा हा नवशिक्यांसाठीचा...
- जगभरात ‘किकबॉक्सिंग’चे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यात ‘प्रदाल सेरे’ (कंबोडिया), ‘सांडा’ (चीन), ‘सावते’ (फ्रान्स), ‘सिकरन’ (फिलिपिन्स), ‘लेथवेई’ (बर्मा) आदींचा समावेश होतो...
- ‘अमेरिकी किकबॉक्सिंग’चा उगम 70 च्या दशकात झाला आणि सप्टेंबर, 1974 मध्ये ‘प्रोफेशनल कराटे असोसिएशन’ (पीकेए) यांच्याकडून पहिली जागतिक स्पर्धा आयोजित केली गेली, जी त्यावेळी भरपूर गाजली...70 च्या दशकापासून हा प्रकार अधिकाधिक लोकप्रिय होत गेला आणि 90 च्या दशकापासून त्यानं ‘मिक्स मार्शल आर्ट्स’च्या उदयास महत्त्वाचा हातभार लावलाय असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही...
- या खेळाची एकच आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था नसून अनेक संघटना कार्यरत आहेत...
- भारतीय खेळाडूंनीही अलीकडच्या काळात किकबॉक्सिंगमध्ये भरीव यश मिळविलंय...उदाहरणार्थ गेल्या महिन्यात कंबोडियामध्ये सुधीर सक्सेनानं ‘आशियाई किकबॉक्सिंग स्पर्धे’त मिळविलेलं रौप्यपदक, बुडापेस्ट-हंगेरी इथं झालेल्या ‘वाको युवा विश्व किकबॉक्सिंग स्पर्धे’त ‘18 किलो पॉईंट फाइट’ गटात भटकळ-कर्नाटक येथील धन्विता वासू मोगेरीनं पटकावलेलं विश्वविजेतेपद अन् कारवार प्रांतातील इनोर्वा अवनी सूरज राव हिनं प्राप्त केलेलं रौप्य...
Advertisement