खेळ जुनाच ओळख नवी ! ‘क्लासिकल चेस’
11:29 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
क्लासिकल चेस...त्याला ‘स्टँडर्ड चेस’ किंवा ‘स्लो चेस’ असंही म्हटलं जातं. बुद्धिबळाच्या सर्वांत दीर्घ प्रकारांपैकी एक. असं असलं, तरी इथंही प्रत्येक खेळाडूला सर्व चाली करण्यासाठी ठरावीक वेळ असतो. आजकाल ‘क्लासिकल चेस’ लढत एकाच बैठकीत खेळली जाते. मात्र पूर्वी अशा लढतीत विराम घेतला जायचा...‘क्लासिकल चेस’चं एकदिवसीय स्वरूप ‘कॉरस्पॉडन्स चेस’पेक्षा वेगळं. ‘कॉरस्पॉडन्स’मध्ये लढती अनेक दिवस चालतात...
Advertisement
- ‘क्लासिकल चेस’ला संथ मानलं जात असलं, तरी प्रत्यक्षात आता त्याच्या लढती लहान होत चालल्या आहेत...1851 साली लंडनमध्ये झालेल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आणि त्याआधी खेळाडूंना चाल करण्यासाठी वाटेल तितका वेळ मिळायचा. काही खेळाडू याचा फायदा उठवायचे अन् लढत दिवसभर चालायची. त्या दशकाच्या उत्तरार्धात घड्याळं दाखल होऊन शेवटी खेळाडूंना ठरावीक वेळेत अमूक चाली करायला हव्यात असं बंधन घालण्यात आलं...
- 20 व्या शतकातील बहुतांश काळ ‘क्लासिकल गेम’मध्ये प्रत्येक खेळाडूला 40 चाली करण्यासाठी दोन तास मिळायचे आणि 40 चालींनंतर जास्त अवधी मिळायचा. मात्र आता खेळाडूंना पहिल्या 40 चालींसाठी क्वचितच 90 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मिळतो....
- गेल्या वर्षी ‘फिडे’ विश्वचषकातही खेळाडूंना पहिल्या 40 चालींसाठी 90 मिनिटं अन् त्यानंतर उर्वरित खेळासाठी दिली गेली 30 मिनिटं. खेरीज खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक चालीसाठी अतिरिक्त 30 सेकंद देखील मिळाले. यामुळं वैयक्तिक लढती बराच तास चालल्या...
- 2021 साली दिग्गज मॅग्नस कार्लसननं जगज्जेतेपदाचा किताब मिळविताना इयान नेपोम्नियाचीचा 7 तास, 45 मिनिटं चाललेल्या सामन्यात 136 चालीनंतर पराभव केला होता. जागतिक स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वांत दीर्घ काळ चाललेली लढत. 14 लढतींच्या मालिकेतील तो सहावा सामना होता...
- अनेक वर्षं ‘क्लासिकल’ हाच सर्वांत लोकप्रिय बुद्धिबळ प्रकार होता आणि ‘रॅपिड’ तसंच ‘ब्लिट्झ’ला तितकं महत्त्व नव्हतं. क्वचितच त्यांच्या स्पर्धा व्हायच्या. पण 90 च्या दशकात आणि विशेषत: 21 व्या शतकात या वेगवान प्रकारांची लोकप्रियता वाढीस लागली. आजकाल ‘क्लासिकल’ची लोकप्रियता ‘ब्लिट्झ’पेक्षा कमी आहे यात शंकाच नाही...
- असं असलं, तरी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा ही ‘क्लासिकल’ पद्धतीनंच खेळली जाते...शिवाय अधिकृत ‘रेटिंग’ यादी ही त्यावरून ठरते आणि बक्षिसापोटी सर्वांत मोठी रक्कम ठेवली जाते ती याच प्रकारात. खेळाडूंचे ‘ग्रँडमास्टर’पर्यंतचे किताब मिळविण्याचा मार्ग येथूनच जाते...
- सर्वांत अचूक बुद्धिबळ अजूनही ‘क्लासिकल’मध्ये पाहायला मिळतो असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. कारण खेळाडूंना विचार करण्यासाठी तिथं भरपूर वेळ मिळतो. त्याचबरोबर चुकांना वाव कमी राहून लढत कमी रंजक ठरू शकते. बरोबरीत शेवट होण्याची शक्यता जास्त असते. जलद सामने जास्त लोकप्रिय होण्यामागचं एक कारण ते हे...
- 2013 पासून 2022 पर्यंत जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा मुकुट राहिला तो महान मॅग्सन कार्लसनकडेच. पण गेल्या वर्षी त्यानं भाग न घेतल्यानं तो किताब चालून गेला चीनच्या डिंग लिरेनकडे आणि लिरेनला यंदा आव्हान देणार तो भारताचा डी. गुकेश. या लढतीची सर्वांना विलक्षण उत्सुकता लागून राहिलीय...
- राजू प्रभू
Advertisement
Advertisement