For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळ जुनाच ओळख नवी ! कॅरम

06:00 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेळ जुनाच ओळख नवी   कॅरम
Advertisement

कॅरम...आपल्याकडे शहरांतच नव्हे, तर गावागावात अन् अगदी घराघरामध्ये पोहोचलेला हा खेळ भारतात 18 व्या शतकापासून खेळला जातोय. ठोस पुरावे उपलब्ध नसले, तरी त्याचा उगम आपल्या भूमीतून झाल्याचं मानलं जातं...भारतीय उपखंडातच नव्हे, तर पाश्चिमात्य जगतातही त्याची लोकप्रियता पसरलेली असून जवळपास 50 देशांमध्ये तो पोहोचलाय...

Advertisement

  • कॅरम हा खेळ दोन खेळाडूंमध्ये किंवा दोन-दोन जणांचे संघ बनवून चार जणांद्वारे खेळला जाऊ शकतो...
  • कॅरम बोर्ड हा 74 सेंटीमीटर लांब तसंच तितकाच रूंद चौकोनी स्वरुपाचा असतो आणि त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत राहतो...चारही कोपऱ्यांत पॉकेट्स आणि चारही बाजूंनी दोन 47 सेंटीमीटर लांबीच्या समांतर काळ्या रेषा आखलेल्या असतात. या रेषांना ‘बेसलाईन्स’ म्हटलं जातं. त्यांच्या दोन्ही टोकांना दोन वर्तुळं असतात...शिवाय चारही कोपऱ्यांत 45 अंशांत रेखाटलेल्या, पॉकेट्सच्या दिशेनं जाणाऱ्या रेषा असतात...त्यांना ओलांडता येत नाही...
  • हा खेळ खेळण्यासाठी नऊ पांढरे व नऊ काळे ‘कॅरममन’ म्हणजे सोंगाट्या आणि एक लाल ‘क्वीन’ तसंच ‘स्ट्रायकर’ची आवश्यकता लागते...बोर्डच्या मध्यभागी लाल रंगाचं वर्तुळ असतं, त्याला ‘सेंटर सर्कल’, तर त्याच्या बाहेरील वर्तुळाला ‘आऊटर सर्कल’ म्हटलं जातं...लाल वर्तुळात ‘क्वीन’ ठेवली जाते व त्याभोवती एक पांढरा व एक काळा अशा प्रकारे आळीपाळीने सोंगाट्या गोलाकार रचल्या जातात...नाणेफेकीद्वारे कोण प्रथम ‘स्ट्रायकर’ हाणून ही रचना फोडणार ते ठरविलं जातं...
  • ‘बेसलाईन्स’वर दोन्ही रेषांना स्पर्श करेल अशा प्रकारे ठेवलेला ‘स्ट्रायकर’ दोन्ही बोटांचा वा एका बोटाचाही वापर करून फटकावता येतो. जो ‘स्ट्रायकर’चा प्रथम वापर करतो त्याला पांढऱ्या सोंगाट्या नि प्रतिस्पर्ध्याला काळ्या सोंगाट्या मिळतात. गोलाकार मांडलेला सोंगाट्यांची रचना फोडण्यासाठी कमाल तीन संधी मिळतात...
  • प्रत्येकानं आपापल्या रंगाच्या सोंगाट्या पॉकेटमध्ये टाकायच्या असतात. जर त्यात यश मिळाले नाही, तर ‘स्ट्रायकर’ प्रतिसपर्ध्याकडे जातो...दुहेरीत तशा परिस्थितीत ‘स्ट्रायकर’ उजव्या बाजूला बसलेल्या खेळाडूकडे जातो...
  • एक सोंगाटी पॉकेटमध्ये टाकली, तर 1 गुण आणि क्वीन टाकली, तर तीन गुण मिळतात. जो खेळाडू आपल्या सर्व सोंगाट्या प्रतिस्पर्ध्याच्या आधी पॉकेटमध्ये टाकून संपवतो तो ‘बोर्ड’ जिंकतो...
  • ‘क्वीन’चे गुण मिळण्यासाठी ती सोंगाटी पॉकेटमध्ये टाकल्यानंतर आपल्या रंगाची एक सोंगाटीही पाठोपाठ पॉकेटमध्ये टाकावी लागते. तसं करता आले नाही, तर ‘क्वीन’ परत काढून मध्यभागी असलेल्या लाल वर्तुळात ठेवावी लागते...एवढ्यावरच भागत नाही, तर ‘क्वीन’चे गुण ‘बोर्ड’ जिंकल्यासच लागू होतात. एखाद्याला बोर्ड जिंकता आला नाही, तर ‘क्वीन’ टाकूनही गुण खात्यात जमा होत नाहीत...22 गुणांवर पोहोचल्यानंतर ‘क्वीन’च्या गुणांचा लाभ मिळणं बंद होतं...
  • एका ‘बोर्ड’मध्ये कमाल 12 गुण मिळविता येतात. एक लढत 25 गुणांची किंवा कमाल आठ ‘बोर्ड्स’ची असते. जो खेळाडू 25 गुणांवर प्रथम पोहोचतो किंवा आठ ‘बोर्ड्स’च्या अंती आघाडीवर राहतो त्याला विजयी घोषित केलं जातं. जर आठव्या बोर्डच्या अंती गुणसंख्या समान असेल, तर आणखी एक बोर्ड खेळविला जातो...
  • जर सोंगाटी न जाता ‘स्ट्रायकर’ थेट पॉकेटमध्ये गेला, तर ‘ड्यू’ म्हणजे दंड स्वीकारावा लागतो. यात त्याची पॉकेटमध्ये गेलेली एक सोंगाटी बाहेर काढून परत बोर्डवर ठेवली जाते...सर्व सामने ‘बेस्ट ऑफ थ्री’ म्हणजे तीन लढतींद्वारे ठरविले जातात.

- राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.