जुगाराचा डाव मात्र समाजसेवेचा आव!
शहर-तालुक्यात गैरधंदे जोमात : अड्डेचालकांकडून सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांना हातभार : अड्डेचालकांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात मटका, जुगार वाढला आहे. गैरधंदे खुलेआम सुरू आहेत. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच दसरा, दिवाळीत जुगाऱ्यांची चलती सुरू आहे. या गैरधंद्यांमुळे मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबे संकटात येत आहेत. कारण या अड्ड्यांवर वावरणाऱ्यांपैकी मध्यमवर्गीयांचीच संख्या अधिक आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी गैरधंदे थोपविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली होती. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनीही सुरुवातीला मटका, जुगारी अड्ड्यांविरुद्ध कारवाईचा सपाटाच सुरू केला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता सर्व गैरधंदे खुलेआम सुरू आहेत, असे दिसून येते. मटका व जुगारी अड्डेचालक पोलिसांच्या आशीर्वादाने निर्धास्त आहेत. आमचे कोणी काय करून घेणार आहेत? या थाटात त्यांचा वावर सुरू आहे. याआधीही बेळगाव येथील मटका, जुगार थोपविण्यासाठी त्या त्या वेळच्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. आता परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली असून पोलीस आयुक्तांनी वेळीच आवर घातले नाहीत तर या गैरधंद्यांचा परिणाम कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर होण्याची शक्यताच अधिक आहे.
दुपारपासून पहाटेपर्यंत अड्डे सुरू आहेत. सध्या तीन प्रमुख अड्ड्यांवर जुगाऱ्यांची गर्दी वाढली आहे. काही जणांनी तर रमी क्लबच्या नावाने परवानगी घेऊन तेथे अंदर-बाहर जुगार चालविण्यात येत आहे. खासकरून बेनकनहळ्ळी जवळील एका पोल्ट्रीफार्मजवळ असलेल्या चिकू बागेत मोठ्या प्रमाणात ताडपत्रीवरील जुगार सुरू आहे. बाची-तुरमुरी परिसरातही मोठ्या प्रमाणात अड्डा थाटण्यात आला आहे. तर यरमाळ रोड, वडगाव परिसरातही मोठ्या प्रमाणात अंदर-बाहर जुगार सुरू आहे. याबरोबरच संपूर्ण शहर व तालुक्यात मटका व्यवसाय जोरात सुरू आहे. बुकी उघडपणे मटका घेत आहेत. आठवड्यातून एक-दोन वेळा दिखाव्यासाठी छोटी-मोठी कारवाई करून मोठ्या अड्डेचालकांना मोकाट सोडले जाते. बहुचर्चित महादेव अॅप संबंधित लोकांचा वावरही बेळगावात आहे. दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तर जुगारी अड्ड्यांवरील वर्दळ वाढली आहे. काही मटका अड्डेचालकांनी तर दसऱ्यात सांस्कृतिक कार्यक्रमात पुढाकार घेतला आहे. गैरधंद्याने मिळविलेल्या पैशातून लोकप्रियता मिळविण्यासाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यात काही जण सहभाग वाढवत आहेत. पोलीस दलाला यासंबंधी संपूर्ण माहिती असूनही या अड्डेचालकांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले आहे.
सीमा लाटकर यांचे धाडस
सीमा लाटकर पोलीस उपायुक्त असताना 23 ऑगस्ट 2018 रोजी कुद्रेमनीजवळ शेतवडीत सुरू असलेल्या एका जुगारी अड्ड्यावर धाडसाने छापा टाकला होता. या कारवाईत 40 जणांना अटक करण्यात आली होती. सुमारे साडेचार लाख रुपये, 44 दुचाकी, 30 मोबाईल जप्त करण्यात आले होते. आता तितक्याच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी अड्डे सुरू असूनही कारवाई मात्र होताना दिसत नाही.