जुगार अड्डा मिरजेत उद्ध्वस्त
मिरज :
मिरज-म्हैसाळ रस्त्यावर द टर्निंग पॉईंट हॉटेलजवळ सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर गुरूवारी रात्री साडेबारा वाजता जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला. स्थानिक पोलीस यंत्रणेला कोणतीही माहिती न देताना पोलीस अधिक्षकांच्या पथकाने खुलेआमपणे सुरू असलेला हा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत चार लाख, 25 हजारांची रोख रक्कम, 20 मोटारसायकली, पाच चारचाकी, एक रिक्षा आणि 66 मोबाईलसह जुगाराचे साहित्य असा 54 लाख, 82 हजार, 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अड्डा चालक संतोष माऊती मोरे (वय 56, रा. होळी कट्टा, मिरज) याच्यासह जुगार खेळणाऱ्या 62 जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगारावर जिह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मिरज-म्हैसाळ रस्त्यावरील द टर्निंग पॉईंट हॉटेललगत मुख्य रस्त्याकडेला एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती अधिक्षक संदीप घुगे यांना मिळाली. अधिक्षकांनी स्थानिक पोलीस यंत्रणेला माहिती न देता संजय गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण स्वामी यांच्यासह विशेष पथकाला पाचारण केले. या पथकाने गुरूवारी रात्री साडेबारा वाजता या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये 50 ते 60 जण पैसे लावून जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी जुगार अड्डा चालक संतोष मोरेसह 62 जणांना ताब्यात घेतले.
जुगार अड्ड्यालगतच मिरज-कागवाड राज्यमार्ग आहे. या रस्त्यावर या जुगाऱ्यांनी चारचाकी व दुचाकींसह रिक्षा आदी वाहने लावली होती. पोलिसांनी जुगार अड्ड्यावऊन चार लाख, 25 हजारांची रोख रक्कम, 25 दुचाकी, पाच चारचाकी आणि 66 मोबाईलसह जुगारचे टेबल, खुर्च्या, पंखे, कुलर आदी साहित्य असा 54 लाख, 82 हजार, 220 ऊपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयीतांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी जुगार अड्ड्यावर नियोजनबद्ध छापा टाकला. सुरूवातीला संपूर्ण शेडला पोलिसांनी घेरा घातला होता. मुख्य रस्त्यावरही नाकाबंदी केली. पोलिसांचा छापा पडताच जुगाऱ्यांची पळापळ सुरू झाली. काहीजण वाहने घेऊन पळून जात होते. मात्र, पोलिसांनी चपळाईने सर्व संशयितांना ताब्यात घेऊन गाडीत घेतले. सकाळी शहर पोलीस ठाण्याच्या आवारातच जुगाराचे सर्व साहित्य व सर्व जप्त मुद्देमाल मांडण्यात आला होता. पंचनामा कऊन संशयीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात जप्त केलेला मुद्देमाल दिसू लागल्याने बघ्यांचीही गर्दी झाली होती.
- स्थानिक पोलीस झोपेत असताना अधिक्षकांनी दिला दणका
मिरज-म्हैसाळ रस्ता हा कर्नाटकला जोडणारा अतिव्यस्त मार्ग. तरीही टर्निंग पॉईंट हॉटेलजवळ खुलेआमपणे चालणाऱ्या जुगार अड्ड्याची माहिती स्थानिक पोलिसांना कशी नव्हती? हा संशोधनाचा विषय आहे. जुगार अड्ड्याबाहेर रात्रंदिवस एखाद्या जत्रेप्रमाणे जुगाऱ्यांची वाहने लागत असताना शहर पोलिसांनी कारवाई केलीच नव्हती. अखेर पोलीस अधिक्षकांना कुणकुण लागली. छापा टाकण्याचे सुत्रबद्ध नियोजन केले. स्थानिक पोलीस झोपेत असताना अधिक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला. खुद्द अधिक्षकांनीच जुगार अड्डा उद्ध्वस्त केल्याचे सकाळी समजले. अन् हप्ते वसूली करणाऱ्या स्थानिक पोलिसांची झोप उडाली.
- अनेक ठिकाणी भरते जुगाऱ्यांची जत्रा
दरम्यान, जुगार अड्डा चालकांना राजकीय वरदहस्त लाभलेले आहे. आपली राजकीय ‘पॉवर’ वापऊन हे नेते सुनसान जागेत असे जुगार अड्डे थाटतात. म्हैसाळ रस्त्यावरील कारवाई हे केवळ उदाहरण म्हणावे लागले. शहरातील इदगाह माळ, अंकली रस्ता, मालगांव रस्ता येथे मोठे जुगार अड्डे आहेत. तेथेही हाय प्रोफाईल जुगारी मंडळी लाखोंचा जुगार खेळतात. स्थानिक पोलिसांना याची कल्पना असूनही मासिक हप्त्यांसाठी कारवाईचे अस्त्र उगारले जात नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षकांनीच याची दखल घेऊन शहरातील अन्य जुगार अड्डेही उद्ध्वस्त केले पाहिजेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.