इंग्लंड दौऱ्यासाठी गंभीरचा मास्टरप्लॅन
चॅम्पियन्स टॉफी पटकावल्यानंतरही गंभीर शांत बसेना : 2027 वनडे वर्ल्डकपसाठी रोडमॅप करण्याच्या तयारीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने न्यूझीलंडला नमवत जेतेपद पटकावले. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळातील हे पहिले यश आहे. आता सर्व खेळाडू आयपीएल 2025 च्या तयारीत व्यस्त झाले आहे, पण गौतम गंभीरने इंग्लंड दौऱ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भारताचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे, पण त्यापूर्वी भारत अ संघ तिथे जाणार आहे. विशेष म्हणजे, गंभीरने स्वत? भारत अ संघासोबत इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून तो तेथील परिस्थिती पूर्णपणे समजून घेऊ शकेल आणि मुख्य दौऱ्याच्या सुरुवातीपूर्वी त्याचा मास्टरप्लॅन तयार करु शकेल.
टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंडिया अ संघासोबत प्रवास करतील. पण, तो प्रशिक्षक म्हणून जाणार की निरीक्षक म्हणून जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. अर्थात, याला अद्याप बराच कालावधी असला तरी गंभीर मात्र आगामी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या हंगामासाठी कोणतीही रिस्क घेण्याच्या तयारीत नाही. जर गंभीर भारत अ संघासोबत इंग्लंडला गेल्यास वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. याला त्यादृष्टीने तितकेच महत्व असणार आहे.
आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी मास्टरप्लॅन
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये भारताची कामगिरी खूपच खराब होती. टीम इंडियाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खराब कामगिरीचा सामना करावा लागला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायनलमध्ये खेळण्याच्या आशाही संपुष्टात आल्या. आता, आगामी इंग्लंड दौऱ्यापासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवा हंगाम सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत गंभीरवर इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी करण्याचे दबाव असेल. विशेष म्हणजे, इंग्लंड दौऱ्यासाटी दोन महिन्यांचा जरी कालावधी असला तरी गंभीर मात्र कोणतीही रिस्क घेण्याच्या तयारीत नाही. आयपीएलनंतर सर्वच खेळाडू टप्प्या टप्प्याने इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होतील. यावेळी भारत अ संघासोबत आधी जात इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेत मास्टरप्लॅन करण्याचा गंभीरचा प्रयत्न असणार आहे.
2027 टी 20 वर्ल्डकपसाठी रोडमॅप करण्यासाठी प्रयत्नशील
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतासमोर पुढील मोठे आव्हान 2027 मध्ये एकदिवसीय स्वरूपात खेळला जाणारा वर्ल्ड कप आहे. म्हणूनच गौतम गंभीर सर्व फॉरमॅटसाठी एक रोडमॅप बनवत आहे, ज्यामध्ये 2026 चा टी 20 वर्ल्ड कप आणि पुढील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाहून परतल्यापासून गंभीर बीसीसीआयशी चर्चा करत आहे. राखीव संघाचे स्पष्ट चित्र पाहण्यासाठी त्याने भारत ‘अ‘ संघासोबत प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गंभीरने काही वाईल्ड कार्ड खेळाडूंसाठी आग्रह धरल्यानंतर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, त्यामुळे भविष्यात त्याच्याकडून अधिक प्रोत्साहनाची अपेक्षा करता येईल, असे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.