For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गंभीर’ पेच !

06:00 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘गंभीर’ पेच
Advertisement

भारताला न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेविरुच्या कसोटी मालिकेतही अनपेक्षितरीत्या पूर्ण धुलाई सहन करावी लागलीय अन् प्रतिस्पर्ध्यांसाठी लावलेल्या फिरकीच्या जाळ्यात स्वत:च अडकून नाकावर आपटण्याची पाळी आलीय...यामुळं आरोपीच्या पिंजऱ्यात उभे झालेत ते प्रशिक्षक गौतम गंभीरचे डावपेच. गंभीरच्या कार्यकाळात मर्यादित षटकांच्या सामन्यांत भारतीय संघानं वर्चस्व गाजविलेलं असलं, तरी कसोटींत मात्र आपली वाटचाल राहिलीय ती निराशाजनक अशीच...

Advertisement

काही दिवसांपूर्वीची गोष्ट....भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका सदस्याला पत्रकारानं प्रश्न विचारला, ‘गौतम गंभीर यांची निवड का करण्यात आलीय ?’...त्या सद्गृहस्थाचं उत्तर होतं, ‘गंभीरमध्ये क्षमता आहे ती भारताला चांगले निकाल देण्याची’...याच्याएवढं फसवं उत्तर मिळणं किमान सध्या तरी ‘नेक्स्ट टू इम्पॉसिबल’...गौतमचे डावपेच हुगळी (पश्चिम बंगाल) व ब्रह्मपुत्रा (आसाम) नद्यांत सपशेल बुडालेत हे क्रिकेटचं सखोल ज्ञान नसलेली व्यक्ती देखील सहज सांगू शकेल...गंभीर भारतीय संघाचं प्रशिक्षकपद सांभाळतोय ते दीड वर्षापासून. भारतानं ‘आयसीसी चॅम्पियन्स चषक’ आणि ‘आशिया करंडक’ जिंकला तो दुबईच्याच मैदानावर. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे चॅम्पियन्स स्पर्धेच्या वेळी अन्य चमू भ्रमंती करत असताना एकाच जागेवर खेळण्याची संधी मिळाली ती फक्त आम्हाला, तर दुसऱ्यांदा इतर संघातील काही प्रमुख खेळाडू हजर नव्हते...

परंतु भारतीय क्रिकेट रसिकांना मर्यादित षटकांच्या सामन्यांमागं धावण्याची सवय लागल्यानं त्यावेळी कसोटी क्रिकेटची कुणालाही आठवण देखील झाली नाही. पण कसोटींचा विचार केल्यास गौतम गंभीरच्या कालावधीचं वर्णन करावं लागेल ते अत्यंत खराब नि निराशाजनक असंच...2024 साल आठवतंय ?...जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतानं जवळपास प्रवेश मिळविल्यातच जमा होता. पण गंभीरनं सूत्रं सांभाळली आणि चार महिन्यांत होत्याचं नव्हतं झालं. न्यूझीलंडनं तिन्ही कसोटींत भारताचा सुपडा साफ केल्यानंतर ऑस्ट्रेलियात देखील आम्ही तीन कसोटी गमावल्या...सध्या चालू असलेल्या स्पर्धेत नऊपैकी तब्बल चार कसोटींत आपल्याला सणसणीत मार खावा लागलाय...सध्या भारत क्रमवारीत लोंबकळतोय तो पाचव्या स्थानावर...

Advertisement

येऊ घातलेल्या दिवसांत भारताला संधी मिळेल ती दोन दौऱ्यांची. न्यूझीलंड व श्रीलंकेच्या भूमींवर त्यांना खेळावं लागेल, तर 2027 मध्ये पाच कसोटी सामन्यांसाठी आपल्याकडे येईल तो ऑस्ट्रेलिया...एकंदर वातावरणाचा विचार केल्यास आपला अंतिम फेरीतील प्रवेश यावेळीही कठीणच वाटतोय...गौतम गंभीरनं भारतातील कसोटी सामन्यांच्या वेळी मागणी केली ती फिरकीला फार मोठ्या प्रमाणात साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांची आणि सौरव गांगुली, हरभजन सिंग, रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा या दिग्गजांसह अनेकांनी या डावपेचावर सणसणीत टींका केलीय...

...‘आम्हाला अशाच प्रकारची खेळपट्टी हवी होती’, ईडन गार्डन्सवरील सामना संपल्यानंतर गंभीर म्हणाला. पण त्या कसोटीत यजमान संघ गारद झाला तो अवघ्या अडीच दिवसांत. गौतम गंभीरनं अशींच मागणी केली होती ती न्यूझीलंडविरुद्ध देखील...कित्येक नामवंत विश्लेषकांनी म्हणायला प्रारंभ केलाय की, त्याच्यात कसोटीसाठी भारतीय संघाला मार्गदर्शन करण्याची क्षमता नाहीये...येऊ घातलेल्या एकदिवसीय व टी-20 लढतींत यश मिळाल्यास सर्व जण पदरात पडलेल्या या अपयशाला कदाचित विसरूनही जातील. क्रिकेट तज्ञांच्या मते, जेव्हा फिरकीचा उत्साह वाढविणाऱ्या खेळपट्ट्यांची &िनर्मिती केली जाते तेव्हा प्रतिस्पर्धी संघातील फिरकी गोलंदाजांना देखील संधी उपलब्ध होते याकडे मात्र दुर्लक्ष होतं. (ऑफस्पिनर हार्मरनं ताज्या मालिकेत 17 भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखविण्याचं काम इमाने इतबारे पार पाडलं. तो दक्षिण आफ्रिकेतर्फे भारतात सर्वांत जास्त बळी मिळविणारा गोलंदाज ठरलाय. यापूर्वी 2007-08 सालच्या मालिकेत जलदगती गोलंदाज स्टेननं तीन कसोटी लढतींत 15 बळी खिशात घातले होते)...

आपल्या भात्यात असलेल्या मोहम्मद सिराज आणि अलीकडे तंदुरुस्त असून देखील दुर्लक्ष केलेला मोहम्मद शमी यांची वाट लावण्याचं काम गौतम गंभीरच्या डावपेचांनी केलंय. चांगल्या खेळपट्टीवर जर कसोटी सामना जास्त वेळ चालला, तर फलंदाजांना संधी मिळते ती शांतपणे फलंदाजी करण्याची. विरोधकांची टीका मान्य नसलेल्या गंभीरनं ‘अंडरप्रिपेर्ड’ खेळपट्ट्यांच्या साहाय्यानं नाणेफेकीचं महत्त्वाच नाहीसं केलंय. पण त्याच्या मनाप्रमाणं मात्र काहीही घडत नाहीये. त्यामुळंच आपल्यावर आलीय ती मायदेशातील पाच कसोटींत हरण्याची पाळी. भारत चार वेळा नाणेफेक हरलाय आणि प्रत्येक वेळी दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याचा प्रसंग आलाय...

मिशेल सँटनर, एज्ा़ाझ पटेल, हार्मर, केशव महाराज यांच्याहून चांगला दर्जा आहे तो रणजीत खेळणाऱ्या कित्येक फिरकी गोलंदाजांचा. पण त्यांना संधी मिळत नाहीये...गौतम गंभीरनं केलेल्या संघाच्या निवडीनं देखील साऱ्यांनाच गेंधळात पाडलंय. त्यानं डावपेच निवडलाय तो ‘सेफ्टी फर्स्ट’चा आणि दर्जाशी तडजोड करून अधिकाधिक अष्टपैलू खेळाडू खेळविण्याचा (त्यामुळं सर्फराज खानसारख्या फलंदाजाला देशी स्पर्धांत खोऱ्यानं धावा जमवून सुद्धा संधी मिळत नाहीये)...या पार्श्वभूमीवर धुमाकूळ घातलाय तो ‘चॉपिंग’ अँड ‘चेंजिंग’ या शब्दांनी. शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, करुण नायर व वॉशिंग्टन सुंदर हे खेळलेत ‘संगीत खुर्ची’ चाललेल्या तिसऱ्या क्रमांकावर. खरं म्हणजे हे स्थान निर्माण करण्यात आलंय ते अतिशय दर्जेदार, तज्ञ फलंदाजासाठी. परंतु कुणालाही तिथं स्थिर होण्याची संधी मिळालेली नाही...

वरील सर्व खेळाडूंकडे कौशल्य आहे यात शंकाच नाही, पण गुंता आहे तो राहुलचा अपवाद सोडल्यास संयमाच्या बाबतीत. मर्यादित षटकांच्या सामन्यांत वेळ कमी असल्यानं अनेक दोषांवर पांघरूण घालणं शक्य असतं. परंतु कसोटींत तेच दोष फास बनून गळ्यात अडकतात...तज्ञांच्या मते, ईडन गार्डन्ससारख्या खेळपट्टीवर सहा गोलंदाजांना खेळविणं योग्य नव्हतं. त्याऐवजी पाच गोलंदाज अन् कसोटी दर्जाचा एक खास फलंदाज यांना संधी देणं योग्य ठरलं असतं. ही बाब खरी असली, तरी हट्टी व्यक्तिमत्व म्हणून विख्यात असलेल्या गौतम गंभीरला ती मान्य होणं कठीणच...

सध्या चाललाय तो फलंदाजीची स्थानं बदलण्याचा कार्यक्रम आणि वॉशिंग्टन सुंदर हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण...ईडन गार्डन्सवर त्यानं अतिशय कठीण अशा खेळपट्टीवर संयमाचं, तंत्राचं दर्शन घडवलं होतं अन् तेही तिसऱ्या क्रमांकावर. तो एखाद्या अनुभवी फलंदाजाप्रमाणं खेळला...पण दुसऱ्या कसोटीत त्याला देण्यात आलं ते चक्क आठवं स्थान. तरीही वॉशिंग्टननं निराश न होता 48 धावा फटकावल्या...तो बऱ्यापैकी ऑफस्पिन टाकत असला, तरी फिरकी गोलंदाज म्हणून त्याला कसोटींत स्थान देणं पचनी न पडणारं...

तिसऱ्या क्रमांकावर दुसऱ्या कसोटीत खेळला तो साई सुदर्शन...दोन्ही डावांत मिळून 30 धावा देखील पार करता न आलेल्या सुदर्शनच्या बाबतीत प्रत्येक कसोटीत चित्र दिसतंय ते खेळपट्टीवरील संघर्षाचं. पहिल्या नऊ डावांमध्ये त्यांची सरासरी 30.33. विशेष म्हणजे ‘लेग’ बाजूनं हवेत फटके हाणण्याची सवय झाल्यानं तो एकाच पद्धतीनं बाद होतोय...असाच आणखी एक खेळाडू म्हणजे नितीशकुमार रे•ाr. त्याला अष्टपैलू म्हणून संघात स्थान देण्यात येतंय. परंतु भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 151 पैकी त्यानं फक्त सहा षटकं टाकली, तर सहाव्या स्थानावर येऊन काढल्या अवघ्या 10 धावा. दुसऱ्या डावात त्यानं त्याहून कमी म्हणजे अवघी चार षटकं इतका मारा केला अन् फलंदाजीत त्याला खातंही उघडणं शक्य झालं नाही...

दोन्ही डावांत मिळून केवळ दोन धावा (पहिल्या डावात 0 व दुसऱ्या डावात 2) जमविता आलेल्या ध्रुव जुरेल सुद्धा त्यांच्याच रांगेत जाऊन बसलाय...दुसऱ्या कसोटीत कर्णधारपद सांभाळलेला यष्टीरक्षक रिषभ पंत सध्या स्वत:च्या पायांवर धोंडा पाडून घेण्यात व्यस्त आहे...एवढं सगळं घडून देखील गौतम गंभीरची पसंती लाभतेय ती त्यांनाच. याशिवाय देवदत्त पडिक्कलच्या वाट्याला आलंय ते फक्त संघाबरोबर ंफिरण्याचं काम...

25 वर्षांपूर्वीची गोष्ट आठवतेय ?...भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लागोपाठ दोन कसोटी सामने गमावले ते मायदेशात. पहिला फिरकीला साथ देणाऱ्या, तर दुसरा फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर...आता पुन्हा एकदा तसंच घडलंय आणि भारतानं 2-0 असा मार खाल्लाय...लाजिरवाणी बाब म्हणजे गुवाहाटीतील निकाल हा धावांचा विचार केल्यास (408 धावांनी) भारताचा कसोटी इतिहासातील सर्वांत मोठा पराभव...त्यावेळी नि आताही एकदा देखील भारताला 250 धावसंख्येचा आकडा ओलांडता आलेला नाहीये अन् त्यातून सारं चित्र स्पष्ट होतंय !

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.