विराट-रोहितच्या फॉर्मवरुन गंभीर-पाँटिंगमध्ये तू-तू मैं-मैं
विराट-रोहितबद्दल केलेल्या वक्तव्यावर गंभीरने सुनावले खडेबोल
वृत्तसंस्था/ मुंबई
भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली व कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहेत. विराट-रोहितच्या या फॉर्मवरुन काही दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंगने प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, सोमवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीरने पाँटिंगला चांगलेच फैलावर घेतले. विराट व रोहितशी संबंधित प्रश्नांना उत्तर देताना त्याने पाँटिंगला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपुरते मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला. अलीकडेच रिकी पाँटिंगने विराटच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले होते. आयसीसीच्या रिह्यूवर बोलताना पाँटिंग म्हणाला होता, मी नुकतीच विराट कोहलीची आकडेवारी पाहिली. त्याने गेल्या पाच वर्षांत फक्त दोन कसोटी शतके झळकावली आहेत. हे मला योग्य वाटलं नाही. पण हे खरं असेल तर, ही चिंतेची बाब आहे. पत्रकार परिषदेत गंभीरला पाँटिंगच्या या कमेंटबद्दल विचारण्यात आले, ज्यावर त्याने अतिशय सडेतोड उत्तर दिले. गंभीर म्हणाला, पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध, मला वाटतं की त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटबद्दल विचार करायला हवा. मला विराट आणि रोहित शर्माची चिंता वाटत नाही. ते दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेटसाठी त्यांनी खूप काही साध्य केले आहे आणि भविष्यातही ते कायम साध्य करत राहतील.