गॅलेंट यांना संरक्षण मंत्रिपदावरून हटविले
पंतप्रधान नेतान्याहू यांचा निर्णय : दोघांमधील विश्वास आला होता संपुष्टात
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांना पदावरून हटविले आहे. आमच्यामध्ये विश्वासाचा अभाव होता, युद्धाच्या काळात हे योग्य नाही असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. आता विदेशमंत्री इस्रायल काट्ज हे संरक्षण मंत्रिपद सांभाळणार आहेत. तर गिदियन सार हे आता इस्रायलचे विदेशमंत्री असतील.
नेतान्याहू यांच्या कार्यालयाकडून मंगळवारी रात्री गॅलेंट यांना पत्र सोपविण्यात आले. यात पत्र मिळाल्याच्या 48 तासांनी संरक्षणमंत्रिपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याचे नमूद होते. तसेच संरक्षणमंत्री म्हणून गॅलेंट यांनी बजावलेल्या सेवेसाठी पत्राद्वारे आभार मानण्यात आले आहेत.
युद्धाच्या प्रारंभी आम्हा दोघांदरम्यान विश्वास होता. आम्ही मिळून काम केले, परंतु मागील काही महिन्यांमध्ये आमच्यामधील हा विश्वास संपत चालला होता. आम्ही युद्धाच्या अनेक पैलूंवर परस्परांशी सहमत नव्हतो. गॅलेंट यांनी कॅबिनेटची मंजुरी नसतानाही निर्णय घेतले आणि वक्तव्यं केली होती असा दावा नेतान्याहू यांनी केला आहे.
याचदरम्यान इस्रायलच्या पंतप्रधानांनी गॅलेंट यांच्यावर शत्रूंना लाभ पोहोचविल्याचाही आरोप केला. आमच्यामध्ये निर्माण झालेले अंतर कमी करण्याचा मी प्रयत्न अनेकदा केला, परंतु असे घडू शकले नाही. हळूहळू जनतेच्या नजरेतही हा प्रकार येऊ लागला. परंतु आमच्या शत्रूंनी याचा लाभ उचलण्यास सुरुवात केल्याने यावर निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरले. विश्वासाच्या अभावामुळे आमच्या सैन्य मोहिमेला नुकसान पोहोचत असल्याचे नेतान्याहू म्हणाले.
यापूर्वीही पदावरून गच्छंती
सरकार आणि मंत्रिमंडळातील बहुतांश सदस्य हे गॅलेंट यांना मंत्रिपदावरून हटविण्याच्या बाजूने आहेत असा दावाही नेतान्याहू यांनी केला आहे. याचबरोबर मागील 2 वर्षांमध्ये नेतान्याहू यांनी दुसऱ्यांदा गॅलेंट यांना पदावरून हटविले आहे. मागीलवेळी देशाच्या न्यायव्यवसथेत बदलाच्या मागणीवरून नेतान्याहू यांनी गॅलेंट यांना संरक्षणमंत्रिपदावरून हटविले होते. परंतु त्यांना एक महिन्याच्या आतच परत पद सोपविले होते.
देशाचे रक्षण करणे हेच लक्ष्य
इस्रायलची सुरक्षा नेहमीच माझ्या जीवनाचे लक्ष्य राहिले आहे. पुढील काळातही मी देशाच्या सुरक्षेसाठी तत्पर राहणार आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजीच्या हल्ल्यात अपहरण करण्यात आलेल्या लोकांच्या मुक्ततेची आवश्यकता आणि युद्धात चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणी मला पदावरून हटविण्याचे कारण ठरली असल्याचा दावा गॅलेंट यांनी केला आहे. इस्रायल आगामी काळात अनेक समस्यांना सामोरा जाणार आहे अशा स्थितीत आमच्याकडे कुठलाच पर्याय नसेल. देशाच्या सर्व नागरिकांना सोबत येत सैन्यात स्वत:ची सेवा द्यावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद पेले आहे.
काट्ज यांना मिळाली जबाबदारी
गॅलेंट यांना संरक्षण मंत्रिपदावरून हटविल्यावर नेतान्याहू यांनी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी इस्रायल काट्ज यांना सोपविली आहे. काट्ज यांनी मागील दोन दशकांमध्ये कृषी, परिवहन, गुप्तचर, अर्थ आणि ऊर्जा विभागांसमवेत अनेक विभागांची मंत्रिपद सांभाळले आहे. 2019 मध्ये त्यांना विदेश मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. विदेश मंत्री म्हणून काट्ज यांनी ऑक्टोबर महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरेस यांच्या इस्रायलमधील प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.