गाला प्रिसीजनचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला
नवी दिल्ली :
वाहनांसाठी लागणाऱ्या डिस्क आणि स्प्रिंग्स बनवणाऱ्या गाला प्रिसीजन इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडचा आयपीओ सोमवार 2 रोजी खुला झाला असून 4 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकीसाठी तो खुला असणार आहे. कंपनी या आयपीओतून 167 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.
सदरचा आयपीओ मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअरबाजारात 9 सप्टेंबर रोजी सुचीबद्ध होणार आहे. कंपनी 135 कोटी रुपयांचे 25,58,416 ताजे समभाग सादर करणार असून सध्याचे गुंतवणूकदार ऑफर फॉर सेलअंतर्गत 32 कोटींचे 6,16,000 समभाग विक्री करणार आहेत. या आयपीओची किंमत 503-529 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी ज्यात 28 समभाग असतील त्याकरीता बोली लावता येते. 529 रुपयेप्रमाणे 1 लॉटसाठी अर्ज करायचा झाल्यास 14,812 रुपये गुंतवावे लागणार आहेत. आयपीओचा 50 टक्के हिस्सा पात्रताधारक संस्थात्मक खरेदीदार यांच्यासाठी राखीव असून याखेरीज 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.
2009 मध्ये कंपनीचा प्रारंभ
कंपनीची सुरुवात फेब्रुवारी 2009 मध्ये झाली होती. कंपनी डिस्क व स्ट्रिप स्प्रिंग्स, कॉईल आणि सर्पिल स्प्रिंग्सची तसेच स्पेशल फास्टनिंग सोल्युशनची निर्मिती करते.