For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेकिनकेरेत गजराजचा धुमाकूळ सुरूच

10:36 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेकिनकेरेत गजराजचा धुमाकूळ सुरूच
Advertisement

70 किलोमीटरच्या प्रवासानंतर सीमाहद्दीत स्थिरावला, भीती कायम

Advertisement

बेळगाव : मागील दहा-पंधरा दिवसांपासून सीमाहद्दीत धुमाकूळ घातलेल्या चाळोबा गणेश या हत्तीचे वास्तव्य अद्याप कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवरील बेकिनकेरे, कौलगे, अतिवाड परिसरात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती कायम आहे. मूळच्या आजरा तालुक्यातून आलेला हत्ती सीमाहद्दीवर स्थिरावला आहे. बुधवारी रात्री 12 वाजता पुन्हा बेकिनकेरे गावाजवळ हत्तीचे दर्शन झाले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये हत्तीबाबत आता दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, ऊस, मका, जोंधळा आणि इतर पिकांचे आता नुकसान होऊ लागले आहे. दिवसभर डोंगर परिसरात विश्रांती घेत असला तरी रात्री डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात उतरू लागला आहे. आतापर्यंत सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी शेतीपिकांचे नुकसान होऊ लागले आहे व आबालवृद्धांमध्ये हत्तीबाबत भय निर्माण झाले आहे.

आजरा तालुक्यात वन्यप्रदेश आहे. या ठिकाणी दोन नर (अण्णा आणि राजा) त्याबरोबर दोन मादी व एक पिल्लू आहे. या कळपातीलच हा हत्ती आहे. मात्र, तो काही दिवसांपासून सैरभैर होऊन गडहिंग्लज तालुक्यातून बेळगाव तालुक्यात दाखल झाला आहे. वनखाते त्याच्या मूळ अधिवासात त्याला नेऊन सोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, रस्त्यावर मानवी वस्ती आणि इतर अडचणी येत असल्याने हत्ती सीमाहद्दीवरच फिरू लागला आहे. बेकिनकेरे, कौलगे डोंगर परिसरात काही प्रमाणात चारा आणि पाणी उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी स्थिरावला आहे. मात्र, रात्रीच्या वेळी भरवस्तीत येत असल्याने भीती व्यक्त होऊ लागली आहे. वनखात्याने हत्तीचा  बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. साधारण 8 ते 10 वर्षांचा हा हत्ती आहे. कळपातील हत्तींच्या झुंजीदरम्यान चाळोबा गणेशच्या उजव्या बाजूचा सुळा तुटला आहे. त्यामुळे हा चाळोबा गणेश हत्ती असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास करून तो बेळगाव सीमाहद्दीवर आला आहे. पुढील नुकसान टाळण्यासाठी त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.