विमानांत स्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड
‘सायबर’ तपासानंतर 25 वर्षीय तरुणाला अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विमानांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या एका संशयिताला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीतील ‘आयजीआय’ विमानतळावर बॉम्बच्या धमकी प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 25/26 ऑक्टोबर 2024 च्या रात्री, सोशल मीडिया खात्याद्वारे आयजीआय विमानतळावर स्फोट घडवण्यासंबंधी दोन संदेश प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने सायबर विभागाकडून करण्यात आलेल्या तपासानुसार तत्काळ कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान, मेसेजचा स्रोत दिल्लीतील उत्तमनगर येथील रहिवासी शुभम उपाध्याय याच्या नावाने नोंदणीकृत खाते असल्याचे आढळून आले. मॅन्युअल इंटेलिजन्स आणि तांत्रिक निरीक्षणाच्या आधारे राजापुरी- उत्तमनगर येथील 25 वषीय तरुणाला अटक करण्यात आली. त्याची सखोल चौकशी केली असता दूरचित्रवाणीवरील तशाच प्रकारची बातमी पाहून स्वत:कडे लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात आपण संदेश पाठवल्याची कबुली त्याने दिली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.