उत्तराखंड दंगलीतील सूत्रधार गजाआड
अब्दुल मलिक याला दिल्लीत केली अटक : आतापर्यंत 60 हून अधिक जण ताब्यात : बनभूलपुरा परिसर अजूनही सील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, देहराडून
उत्तराखंडमधील हल्दवानी येथील बनभूलपुरा येथे अतिक्रमण हटवताना झालेल्या हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली आणि उत्तराखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने मलिकला दिल्लीत अटक केली आहे. मात्र, सध्या पोलीस अधिकारी याबाबत काहीही बोलणे टाळत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी आतापर्यंत 60 हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. हिंसाचारानंतर फरार झालेल्या संशयितांना पकडण्यासाठी राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेवेळी पाच नगरसेवकांनाही अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान अब्दुल मलिकलाही पोलिसांनी रविवारी सकाळी दिल्लीतून अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्दवानी येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर बंद करण्यात आलेली इंटरनेट सुविधा रविवारी पूर्ववत करण्यात आली आहे. बनभूलपुरा वगळता उर्वरित ठिकाणांहून संचारबंदी हटवण्यात आली आहे. प्रशासनाने बाधित भाग वगळता शहरातील उर्वरित भागातून संचारबंदी उठवली आहे. संपूर्ण बनभुलपुरा परिसर, आर्मी (पॅन्ट) वर्कशॉप लाईन, तिकोनिया-तीनपाणी गौलापार बायपास परिसर वगळता संपूर्ण शहर संचारबंदीमुक्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी वंदना यांनी सांगितले. संचारबंदी लादलेल्या क्षेत्रात दूध, रेशन आणि औषधे पोहोचवण्याची व्यवस्था प्रशासनाची टीम करत आहे.