गेल इंडियाचा नफा 27 टक्के वाढला
चेन्नई :
सरकारी कंपनी गेल इंडिया यांनी आपल्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून एकत्रित निव्वळ नफ्यामध्ये 27 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 4084 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने 3193 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीने महसुलामध्ये सुद्धा वर्षाच्या आधारावर सहा टक्के वाढ नोंदवली असून तिसऱ्या तिमाहीमध्ये 36 हजार 937 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. दुसरीकडे याच कालावधीमध्ये कंपनीने 37 हजार 315 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न प्राप्त केले आहे. मागच्या आर्थिक वर्षांमध्ये याच तिमाहीमध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न 35 हजार 181 कोटी इतके होते.
9 महिन्यात 1 लाख कोटीचा महसूल
आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये कंपनीचा महसूल 1 लाख 5 हजार 740 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यासोबतच निव्वळ नफा देखील 34 टक्के वाढीसोबत 9958 कोटी रुपये इतका पहिल्या नऊ महिन्यांमध्ये दिसून आला आहे.