For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गगनयान’चे चार अवकाशवीर घोषित

06:23 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
गगनयान’चे चार अवकाशवीर घोषित
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नावांची घोषणा : चाळीस वर्षांनंतर भारतीय जाणार पुन्हा अंतराळात

Advertisement

वृत्तसंस्था / बेंगळूर

भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ अवकाश अभियानातील चार अवकाशवीरांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अवकाशवीरांची ओळख करुन दिली. ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अशी या अवकाशवीरांची नावे आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) या अभियानाच्या सज्जतेस प्रारंभ केला असून 40 वर्षांच्या अंतरानंतर भारतीय अवकाशवीरांना पुन्हा अंतराळात पाठविण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement

1984 मध्ये अवकाशवीर राकेश शर्मा याने अंतराळ प्रवास करणारा प्रथम भारतीय होण्याचा सन्मान मिळविला होता. तथापि, त्याला अंतराळात नेणारे यात भारताचे नव्हते, तर ते रशियाचे होते. गगनयान अभियान पूर्णपणे भारताचे आहे. हे या दोन्ही अभियानांमधील महत्त्वाचे अंतर आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.

नव्या युगाचा शुभारंभ

भारतात आज अनेक क्षेत्रांमध्ये नव्या युगाचा प्रारंभ होत आहे. अवकाश क्षेत्राचा त्यात पुढाकार आहे. भारताची नवी पिढी अधिक महत्त्वाकांक्षी असून तिची स्वप्नेही मोठी आहेत. सध्याचा काळ हा भारताचा आहे. आगामी काळात आपल्याला अनेक मोठी ध्येये गाठावयाची आहेत. 2035 पर्यंत भारत अंतराळात आपले प्रथम स्थानक स्थापन करण्याच्या दृष्टीने जोमाने प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नावांची घोषणा करताना केले.

अनेक अभिमानास्पद उपलब्धी

गेल्या वर्षी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर यान उतरविणारा जगातील प्रथम देश होण्याचा मान मिळविला. त्यानंतर ‘शिवशक्ती बिंदू’मुळे भारताच्या अवकाश क्षेत्रातील सामर्थ्याचे दर्शन साऱ्या जगाला घडले. आज, भारत आणखी एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होत आहे. आज, अंतराळात जाणाऱ्या चार अवकाशवीरांची नावे घोषित करण्यात आली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

अवकाशवीरांचे अभिनंदन

नावांची घोषणा झाल्यानंतर आणि अवकाशवीरांची जगाला ओळख करुन दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही अवकाशवीरांचे अभिनंदन केले. चार वर्षांपूर्वीच भारताने गगनयान अभियानाची घोषणा केली होती. तेव्हापासूनच अनेक अवकाशवीरांना प्रशिक्षण देण्यात येत होते. त्यांच्यापैकी चार जणांची मंगळवारी निवड करण्यात आली आहे. आम्ही गेल्या दहा वर्षांमध्ये अवकाश संशोधन क्षेत्रात देदिप्यमान प्रगती साध्य केली आहे. हे चार अवकाशवीर भारताचे नाव आणखी प्रकाशमान करतील, अशा शब्दांमध्ये त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

तीन अभियाने पूर्ण

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस. सोमनाथ यांनीही या प्रसंगी अवकाशवीरांना शुभेच्छा दिल्या. संस्थेने तीन महत्त्वाची अभियाने आतापर्यंत वेळेत पूर्ण केली आहेत. या अभियानांमुळे इस्रोची व्याप्ती वाढली असून संस्थेच्या पायाभूत सुविधांमध्येही मोलाची भर पडली आहे. विशेषत: चांद्रयान-3 आणि आदित्य एल वन या यशस्वी अभियानांमुळे जगाचे लक्ष भारताकडे वेधले गेले आहे. 2047 पर्यंत विकसीत देश होण्याची भारताची महत्त्वाकांक्षा आहे. आपली संस्था हे ध्येय गाठण्यात आपले मोलाचे योगदान देईल, असा विश्वास सोमनाथ यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केला. तसेच त्यांनी भविष्यातील अभियानांची सविस्तर माहिती दिली. पीएसएलव्हीचा त्यांच्यात प्रामुख्याने समावेश होता.

योगाचे प्रशिक्षणात महत्त्व

गगनयान अभियानासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात योगाचा समावेश होता. योग ही भारताची जगाला देणगी आहे. योगासनांमुळे शरीर आणि मन या दोन्हींचे उत्तम संवर्धन होते. त्यामुळे आज संपूर्ण जगात योगव्यायाम अत्याधिक लोकप्रिय बनला आहे. प्रशिक्षणार्थी अवकाशवीरांनाही याचा अनुभव आला आहे.

अवकाशवीर कोण आहेत

गगनयान अभियानासाठी निवडण्यात आलेले चारही अवकाशवीर भारतीय वायुदलात वैमानिक आहेत. त्यांना सुखोई, मिग-29, मिराज आदी अत्याधुनिक विमानांच्या उ•ाणांचा मोठा अनुभव आहे. त्यांची शारिरीक आणि मानसिक क्षमता पाहून, तसेच चार वर्षांच्या कठोर प्रशिक्षणातील त्यांची कामगिरी पाहून त्यांची या महत्त्वाकांक्षी अभियानासाठी निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

गगनयान अभियानाची सज्जता

ड गगनयान अभियानासाठी अनेक प्रशिक्षणार्थींमधून चार जणांची निवड

ड शारिरीक आणि मानसिक क्षमता, तसेच अन्य कठोर निकष समाविष्ट

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घोषणेनंतर अनेकांकडून अभिनंदन

ड भारताच्या अभिमानास्पद तंत्रवैज्ञानिक प्रगतीत इस्रोचे महत्त्वपूर्ण योगदान

Advertisement
Tags :

.