गगनबावडा तालुक्याचा 'पर्यटन तालुका' म्हणून आराखडा तयार करावा
आमदार चंद्रदीप नरके यांची राज्य पर्यटन संचलनालयाकडे मागणी
कोल्हापूरः (वाकरे)
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोल्हापूर जिल्हयातील गगनबावडा तालुक्याचा "पर्यटन तालुका" म्हणून विकसित करण्यासाठी आराखडा तयार करावा अशी मागणी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन संचालनालयात घेतलेल्या बैठकीत केली. यावेळी पर्यटक संचालक बी. एन. पाटील व रविंद्र पवार उपस्थित होते. रवींद्र पवार यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून घ्यावा, अशी शिफारस केली.
आमदार नरके म्हणाले, की गगनबावडा तालुक्यात अनेक पुरातन मंदिरे असून या तालुक्यात मोठया प्रमाणात पाऊस पडतो. पावसाचे आगार असलेल्या गगनबावडा तालुक्यात, कोदे, लखमापूर, वेसरफ, अणदूर येथील धरणे आहेत. औषधी वनस्पतीने समृध्द दऱ्या - खोऱ्या आणि हिरवाईने नटलेला निसर्ग असा गगनबावडा तालुका ३९ महसूली गावे आणि वाडया-वस्त्यांनी विखूरलेला, अविकसित व डोंगराळ तालुका आहे. येथील जमीन जांभ्या व तांबूस तपकीर रंगाची आहे.
पुढे ते म्हणाले, की सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये वसलेल्या या तालुक्यातून धामणी, जांभळी व कुंभी अशा तीन नद्या वाहतात. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५००० मिलीमीटर आहे. पावसाळयात धो- धो पडणाऱ्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी आणि दऱ्याखोऱ्यातून वाहणारे धबधबे पहाण्यासाठी मोठया प्रमाणात पर्यटक येतात. गगनाला गवसनी घालणाऱ्या उंच डोंगर रांगा, घनदाट आरण्य असलेल्या तालुक्यात अंजनी, हिरडा, सावर, बेहडा,कुंभा, जांभूळ, हुंबर, पायर, आंबा, एैन, किंजळ, नाना, हैद, सुरंगी फनसी, आंबेरी, या वनस्पती आढळतात. त्याचप्रमाणे बांबू आणि रान चिवा याचे मोठया प्रमाणात उत्पादन होते. शिकेकाई, तमालपत्री, मध, मेण, गार्दळ, कडीपत्ता, जांभूळ, हिरडा, अशा औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात आढळतात. सन १६५९ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी गगनगड स्वराज्यात सामिल करुन घेतला. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या कारर्कीदीपासून पंत अमात्य बावडेकर यांच्या जहागिरीचा हा प्रांत झाला.
गगनबावडा तालुक्यामधील पळसंबे येथील रामलिंग देवस्थान हे अखंड मोठया खडकातील गुहेत आहे. दगडमध्ये कोरलेली १२ जोर्तिलिंगे पहावयास मिळतात. अखंड पाषाणात खांब व कळसासहित कोरलेली मंदिरे पर्यटकांचे आकर्षण ठरली आहेत. तसेच गगनबावडा येथे गगनगड असून येथे गगनगिरी महाराज यांचे वास्तव्य होते. अशा या ऐतिहासिक व पुरातन पार्श्वभूमी असलेल्या आणि निसर्गरम्य अशा अविकसीत तालुक्याला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यास येथील बेरोजगारांना रोजगार मिळेल. पर्यायाने तालुक्याच्या आणि राज्याच्या विकासातही भर पडेल, असे नरके म्हणाले.