Gagan Bawada: गगनबावडा आरोग्य विभाग आणखी किती जणांचा बळी घेणार?
दक्षिणेला चार किलोमीटरवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे
By : रामचंद्र कुपले
गगनबावडा : गगनबावड्यात सोमवारी रात्रंदिवस पाऊस पडला. मात्र मंगळवारी नदी, ओढे नाल्यांना पूर आला. अशातच बोरबेट येथील कल्पना डुकरे यांना रुग्णवाहिकेतून गगनबावडा व कोल्हापूरला नेताना वाटेतच पडवळवाडी येथे रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली.
नवजात बालकाच्या मृत्यूने खरे तर तालुका आरोग्य विभागातील सुविधांची वाणवा, अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. बोरबेट येथे उपकेंद्र आहे. तर दक्षिणेला चार किलोमीटरवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पश्चिमेला नऊ किलोमीटरवर गगनबावडा येथे ग्रामीण रुग्णालय आहे.
तालुका मध्यवर्ती ठिकाण निवडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सोयी कमी गैरसोयी अधिक. तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्राबाबत असेच आहे. स्थानिक जनतेला मात्र याचा मोठा फटका बसत आहे. गारीवडे आरोग्य केंद्राची इमारत नव्याने बांधली आहे. बांधकाम व अंतर्गत कामे पूर्ण करुन तीन वर्षे झाली.
नवीन इमारतीत हे आरोग्य केंद्र केव्हा स्थलांतरीत होणार, यांचे वेध लागले आहेत. 2005 पासून हे आरोग्य केंद्र 10 बाय 10 फुटांच्या खोलीत सुरु आहे. त्यामुळे महिला व भरीत भर म्हणजे गर्भवतींवर कसे उपचार केले जातात, हा संशोधनाचा विषय आहे.
रुग्णवाहिकेतून या महिलेस गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हात वर करुन कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयाचा रस्ता दाखवला. काही अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. पण त्यांचा जनतेसाठी वापर करावा ही मानसिकता तयार करण्याची गरज आहे.
44 महसुली गांवे, 29 ग्रामपंचायतींचा समावेश असलेला गगनबावडा तालुका विस्ताराने मोठा पण लोकसंख्येने छोटा आहे. गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालय, गारीवडे व निवडे येथील आरोग्य केंद्रे तर 10 उपकेंद्रांच्या माध्यमातून येथील जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. करुळ आणि भूईबावडा घाट, गगनबावडा-कोल्हापूर राष्ट्रीय मार्गावर अपघाताच्या घटना वारंवार घडतात.
अतीपाऊस, महापूर अशा आपत्कालीन स्थितीत जनतेला सेवा मिळणे आवश्यक असते. 24 तास सेवा देणारे या विभागाचे किती अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी मुक्कामी राहतात यांचाही विचार होणे आवश्यक आहे. आकस्मिक घटनेवेळी येथे मात्र उलट परिस्थिती आहे. अशावेळी लोकांचे धिंडवडे काढले जातात. मंगळवारी घडलेल्या घटनेवरुन यांचा अनुभव आला आहे.
जनतेतून तीव्र नाराजी
"गारीवडे येथे आरोग्य केंद्र असूनही सुविधांअभावी वैळी, अवेळी, रात्री अपरात्री सीपीआरकडे धाव घ्यावी लागते. वेळेत उपचार न मिळाल्याने कित्येकांचा नाहक बळी गेला आहे. मंगळवारी या विभागाच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकांचा बळी गेला आहे. याकारणाने आरोग्य विभागाच्या निक्रीय कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे."
- संतोष पाटील, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत बोरबेट,गारीवडे
अवेळी प्रसुती
"बोरबेट येथील सौ. कल्पना डुकरे हिची सातव्या महिन्यात म्हणजे दोन महिने अगोदर प्रसुती झाली होती. बाळाची निकोप वाढ झाली नव्हती, परिणामी ही दुर्दैवी घटना घडली. आरोग्य विभागाने आवश्यक पाठपुरावा केला होता. पण यश आले नाही."
- डॉ. विशाल चोकाककर, तालुका वै द्यकी य अ धकारी ,गगनबावडा