गेल मोनफिल्स अंतिम फेरीत
वृत्तसंस्था / ऑकलंड
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या ऑकलंड खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या 38 वर्षीय गेल मोनफिल्सने एकेरीची अंतिम फेरी गाठली. मोनफिल्सने वयाच्या 38 व्या वर्षी एटीपी टूरवरील 35 व्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. यापूर्वी असा विक्रम इव्हो कार्लोव्हिकने केला होता.
ऑकलंड स्पर्धेतील एकेरीच्या उपांत्य सामन्यात मोनफिल्सने अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या निशेष बसवरे•ाrचा 7-6 (7-5), 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. एटीपी टूरवरील स्पर्धेमध्ये 2019 साली पुणे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये कार्लोव्हिक हा अंतिम फेरी गाठणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या वयाच्या 39 वर्षे 311 दिवस झाले असताना हा विक्रम केला. मोनफिल्सने आपल्या वयाच्या 38 वर्षे 131 दिवस झाले असताना अंतिम फेरी गाठली आहे. स्वीसच्या वावरिंकाने आपल्या वयाच्या 38 वर्षे आणि 124 दिवस झाले असताना क्रोएशियातील एटीपी टूरवरील स्पर्धेत 2023 साली अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. मोनफिल्सने वावरिंकाचा हा विक्रम मागे टाकला आहे. स्वीसच्या रॉजर फेडररने 2019 साली बेसील येथे झालेल्या स्पर्धेत आपल्या वयाच्या 38 वर्षे आणि 80 दिवस झाले असताना अंतिम फेरी गाठली होती. स्पेनच्या राफेल नदालने 2024 साली स्वीडीश खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या वयाच्या 38 वर्षे आणि 48 दिवस झाले असताना एकेरीची अंतिम फेरी गाठली होती.
भांब्री-ओलीव्हेटी दुहेरीत पराभूत
एएसबी क्लासीक ऑकलंडमध्ये सुरू असलेल्या टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांब्री आणि त्याचा फ्रान्सचा साथीदार ओलीव्हेटी यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टॉप सिडेड जोडी मेकटिक आणि व्हिनस यांनी भांब्री व ओलीव्हेटी यांचा 6-3, 1-6, 10-5 अशा सेटस्मध्ये पराभव केला.