जयंतरावांच्या संकुलातील गडकरींचा दौरा लक्षवेधी!
आंतरराष्ट्रीय वसतीगृह, जिम्नॅसियमचे उद्घाटन
जयंतरावांच्या भाजप प्रवेशच्या चर्चा पार्श्वभूमीवर दौरा
नागरिकांचे दौऱ्याकडे लक्ष
इस्लामपूरः युवराज निकम
राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशिअमच्या उद्घाटनासाठी आज सोमवारी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे येत आहेत. आ. जयंत पाटील हे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा असताना गडकरी हे त्यांच्या शिक्षण संकुलात येत असल्याने हा दौरा लक्षवेधी ठरणार आहे.
आर.आय.टी.ने महाराष्ट्रामध्ये प्रथमच प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग या अत्याधुनिक आणि प्रगत बांधकाम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह व अत्याधुनिक जिम्नॅशिअम उभारले आहे. या वास्तूंचा उदघाटन सोहळा आज होत आहे. त्या निमित्ताने जयंतराव यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना निमंत्रित केले आहे. गडकरी हे भाजपामधील वजनदार नेते आहेत आणि ते प्रथमच राजारामबापू उद्योग व शिक्षण संकुलात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला काही अंशी राजकीय कंगोरे आहेत.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पिछेहाट झाली. त्यामुळे पक्षात अस्वस्थता आहे. ‘यशाचे धनी अनेकजण असतात, पण अपयशाचे धनी कुणी नसते‘ या उक्तीनुसार लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस श. प. पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर पक्षात श्रेयवादावरुन कलगीतुरा रंगला. विधानसभा निवडणुकीत पक्षाची घसरण झाली. या दोन्ही निवडणुकीवेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच होते. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या बैठकीत जयंतराव यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्याची मागणी पक्षातील काहींनी केली. त्यामुळे जयंत पाटील हे काहीसे दुखावले आहेत.
या संपूर्ण घडामोडी नंतर जयंतराव हे भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली. त्यांची भाजपच्या काही जेष्ठ नेत्यांशी बोलणी झाल्याचेही समजते. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या दि. 17 जानेवारी रोजीच्या स्मृतिदिन कार्यक्रमां नंतर ते भाजपात प्रवेश करतील, असा अनेकांचा अंदाज होता. पण काही अटी व शर्थीमुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त रेंगाळला आहे. रविवारी आ. जयंत पाटील यांचा वाढदिवस इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रमांनी साजरा झाला आहे. अशातच गडकरी हे येत आहेत. जयंतराव आणि नितीन गडकरी यांच्यात चांगले सख्य आहे. दोघांकडे कामाचा झपाटा आहे. दोन्ही नेते अभ्यासू आहेत. त्यामुळे पक्षभेद विसरुन त्यांची मैत्री आहे. जयंतराव यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर गडकरी हे येत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला महत्त्व आहे.