संकल्प गडकरींचा प्रगतीचा
आधुनिक भारताचा पायाभूत सुविधा निर्माण करणारा लोहपुऊष म्हणून ओळखले जाणाऱ्या केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी पुढील दोन वर्षात दहा लाख कोटी रुपये गुंतवणुकीतून महामार्ग आणि देशातील प्रमुख मार्गांचे जाळे विणणार असल्याचे जाहीर केले. देशात 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत विकासकामांचा आढावा घेता सर्वाधिक चांगले काम हे दळणवळण क्षेत्रात झालेले आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रीय महामार्गांचे झालेले काम आणि नव्याने उभारण्यात आलेले व येणारे रस्ते यांचा विचार करता जे अशक्य होते ते शक्य करून दाखवण्याचे एक कौशल्य मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्षात दाखवून दिले. म्हणूनच आधुनिक भारताचा पायाभूत सुविधा क्षेत्रातील लोहपुऊष म्हणून नितीन गडकरी यांची नेहमीच ओळख होईल. इसवी सन 2014 मार्चपर्यंत देशात 91 हजार 287 किलोमीटरचे जाळे राष्ट्रीय महामार्गांचे होते, आज ते 146204 किलोमीटरपर्यंत पोहचलेले आहे. वर्षभरात 5614 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम केलेले आहे. गडकरींकडून देशाला फार मोठ्या अपेक्षा आहेत. राष्ट्रीय महामार्ग तसेच देशातील प्रमुख मार्ग यांचे बांधकाम करून देशाला सर्वदूर वाहतुकीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जात आहे. यातून देशाची प्रगती जलद गतीने होईल. आजही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीमाल पडून असतो किंवा तो सडूनही जातो कारण एक तर त्या मालाला दर मिळत नाही, दुसरी गोष्ट अशी की हा माल शहरांमध्ये नेऊन विकण्यासाठी वाहतूक सुविधा नाही, कारण त्या त्या गावांमध्ये रस्ते देखील नाहीत. ‘गाव तिथे रस्ता’ ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविली आणि देशातील अनेक गावे रस्त्यांनी जोडून निघाली. प्रगतीचे पाऊल हे अशा पद्धतीने पुढे पडत राहते. एखादा राष्ट्रीय महामार्ग बांधायचा, ही तशी सोपी गोष्ट नाही. कारण आज जाईल त्या ठिकाणी प्रत्येकजण विकास प्रकल्पांना विरोध करत असतो. त्यातल्या त्यात राष्ट्रीय महामार्ग बांधावयाचे झाल्यास त्यासाठी प्रचंड जमीन लागते. आहे त्या महत्त्वाच्या मार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यास नागरिक विरोध करतात. कारण त्यांना पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्यांची जमीन गेल्यानंतर नुकसान भरपाई मिळत नाही. गडकरी हे असे नेते आहेत की ते सर्वसामान्यातल्या सामान्य वर्गाला देखील विश्वासात घेऊन त्यांची कामे जलद गतीने व्हावी यासाठी प्रयत्न करीत असतात. गेल्या दहा वर्षात केंद्रातील मोदी सरकारने 54917 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग उभारले ही फार कौतुकास्पद बाब आहे. भारतातील रस्ते हे अमेरिकेतील रस्त्याप्रमाणे गुळगुळीत आणि तेवढेच मजबूत अशा पद्धतीचे व्हावेत आणि आपण ते साध्य करून दाखवू असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगतात आणि त्याच उद्देशाने त्यांनी पुढील दोन वर्षात दहा लाख कोटी ऊपये खर्चून रस्ते, महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांचे बांधकाम करण्याचा इरादा व्यक्त केला आहे. सध्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये फारच कमी प्रमाणात रस्ते आहेत आणि जे काही रस्ते आहेत ते फार पूर्वी उभारलेले व ते वाहतुकीस तसे धोकादायक देखील आहेत. त्यामुळे आता नव्याने जे काही रस्ते उभारण्याचा घाट मंत्री गडकरी यांनी घातलेला आहे तो पाहता ईशान्येकडील राज्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. काही राज्यांमधील राष्ट्रीय महामार्ग किंवा तेथील महामार्ग हे महामार्ग आहेत हे सांगावे लागते अशा स्थितीमध्ये आहेत. वाहतुकीचा अभाव, त्यामुळे ईशान्येकडील अनेक मंडळी देशाच्या विविध भागात आपल्या नोकरी, धंदा व्यवसाय व शिक्षणासाठी गेली. ईशान्येकडील अनेक गावे ही नागरिकांच्या फारच कमी प्रमाणातील राहण्यामुळे ओस पडू लागली आहेत. त्यातून प्रश्न येतो तो संस्कृतीचा. ईशान्येकडील संस्कृती ही आपल्या देशाची संस्कृती आहे. जसजशी माणसे त्या भागातून दुसऱ्या राज्यात जातात आणि तिथेच स्थायिक होतात आणि नंतर तेथील संस्कृतीशी मिळून घेतात. परिणामी आपल्या मूळ संस्कृतीकडे ती दुर्लक्ष करतात. यातून संस्कृतीचा पाहिजे त्या प्रमाणात विकास होत नाही. विकासाची संकल्पना ही छोट्या छोट्या गोष्टीतून साकार होत असते. एखाद्या गावाचा विकास करावयाचा झाल्यास त्यासाठी प्रथम रस्ता, वीज या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. समजा पाण्याची व्यवस्था नसली तर जवळपास कुठे असलेल्या नदीवर पंप लावून पाणी ओढून ते सर्वांपर्यंत पोहोचविता येते परंतु त्यासाठी वीज आवश्यक आहे. आणि वीज पाहिजे असल्यास रस्ते देखील फार महत्त्वाचे आहेत. या देशात महामार्गांच्या क्षेत्रात फार मोठी क्रांती गेल्या दहा वर्षात दिसून आली आहे. आता पुढील दोन वर्षात दहा लाख कोटी रुपये खर्च करणार म्हटल्यानंतर या देशातील रस्त्यांची परिस्थिती केवढी सुधारणार याचा विचार करावा लागेल. ईशान्य भागातील राज्यांमध्ये 21355 किलोमीटर लांबीचे त्याचबरोबर तीन लाख 73 हजार 484 कोटी रुपयांच्या खर्चाचे 784 महामार्गांचे प्रकल्प हाती घेतले जातील अशी घोषणा करून ईशान्य भागातील राज्यांसाठी आणि तेथील जनतेसाठी तो एक फार मोठा दिलासा दिला आहे. काही वेळा एका गावातून जवळच असलेल्या दुसऱ्या गावात जाण्याकरिता वाटेत लागणारा उंच उंच पर्वत तो ओलांडून जाणे म्हणजे जवळपास 30-40 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. त्याऐवजी नव्या योजनेतून दोन डोंगरांमध्ये एक पूल बांधणे, बोगदा काढणे वगैरे योजना राबविल्या तर फार मोठे इंधनही वाचेल आणि जनतेला एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी त्वरित जाणे शक्य होईल. नितीन गडकरी यांनी विकासाच्या पाऊलखुणा या देशातीलच नव्हे तर जगातील अनेक राष्ट्रांना दाखवून दिल्या आहेत. भारत आता थांबणार नाही आणि विकासाचा व प्रगतीचा वेग हा जगातील अत्यंत प्रगत राष्ट्रांच्या बरोबरचा असेल किंबहुना काही क्षेत्रांमध्ये तो त्याही पुढे जाईल, असा मंत्र दिलेला आहे. बिहारमध्ये 90 हजार कोटी ऊपयांचे राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प हाती घेतलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 42 हजार कोटी तर आसाममध्ये 57,696 कोटी ऊपयांचे प्रकल्प हाती घेतलेले आहेत. ओरिसामध्ये 58 हजार कोटी आणि झारखंडमध्ये 53 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेणे म्हणजेच देश राष्ट्रीय महामार्गाच्या क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र बनेल हा उद्देश असावा. अनेक राष्ट्रांमध्ये राष्ट्रीय महामार्ग आहेत, आंतरराष्ट्रीय महामार्ग देखील आहेत परंतु भारतात जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महामार्ग आहेत ते निश्चितच विकासाला शिखरस्थानी नेऊन बसविणारे आहेत. नितीन गडकरी यांची ओळख मॅन ऑफ प्रॅक्टिकल्स म्हणून सुपरिचित आहे. दहा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प केवळ पुढील दोन वर्षात उभारण्याचा संकल्प करणारे नितीन गडकरी हे नेहमीच पैशांची वाट पाहू नका, पैसे आपसुकच चालत येतील. जे काम करणार आहात ते प्रामाणिकपणे करा असाच सल्ला देशातील सर्वच राज्यांना शिवाय रस्ता वाहतूक क्षेत्रातील कंत्राटदार, अभियंत्यांना देत असतात. भारताला प्रगतीपथावर न्यावयाचे असल्यास आज आवश्यक आहे ती प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे. रस्ता, वीज, पाणी या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.