आरआयटीतील वास्तूंचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन
इस्लामपूर :
राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सोमवार 17 रोजी दुपारी 3 वाजता नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशिअमचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार, असल्याची माहिती कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत व महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले यांनी दिली.
आमदार जयंत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. आरआयटी चेअरमन भगतसिंह पाटील, कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्यासह आमदार, खासदार, स्थानिक संस्थांचे पदाधिकारी व उद्योजक उपस्थित राहणार आहेत. सावंत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये प्रथमच प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग या अत्याधुनिक आणि प्रगत बांधकाम तंत्रज्ञानाच्या साहायाने आरआयटी मधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह निर्माण झाले असून अलीकडच्या काळातील उत्कृष्ट स्थापत्य नमुना म्हणून या वास्तूचा उल्लेख होणार आहे.
वसतीगृहातील रूम वातानुकूलित असून इमारतीच्या तळमजल्यात एकाच वेळी एक हजार विद्यार्थी जेवण करू शकतील एवढ्या मोठ्या डायनिंग हॉलची सोय आहे. अत्याधुनिक जिम्नॅशिअममध्ये ऑलिम्पिक स्पर्धकांच्या सरावासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक मशीन्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. संपूर्ण जिम्नॅशिअम बिल्डिंग वातानुकूलित असून योग सेंटर आणि स्टीम बाथ सारख्या सुविधाही यामध्ये असणार आहेत तसेच एकाचवेळी शंभर विद्यार्थी याचा लाभ घेतील.
डॉ. कडोले म्हणाले, उत्कृष्ट प्रकारच्या स्थापत्य अभियांत्रिकीचा नमुना असणाऱ्या दोन्ही इमारतीचे उद्घाटन तेवढ्याच मोठ्या उंचीच्या माणसाच्या हस्ते व्हावे, असा आग्रह आमदार जयंत पाटील व भगतसिंह पाटील यांचा होता आणि म्हणूनच भारताला रस्ते विकासात अग्रेसर बनवण्यासाठी महत्वाची भूमिका असणाऱ्या आणि भारतीय अभियांत्रिकी कौशल्याची ओळख संपूर्ण जगाला दाखविणाऱ्या मंत्री नितीन गडकरी यांना यासाठी निमंत्रित केले आहे.
या वर्षात अफगाणिस्तान, नेपाळ, साऊथ सुदान, झिम्बाब्वे, बांगलादेश, यु.एस.ए, आणि आयवोरी पोर्ट या देशातून 57 विद्यार्थ्यांनी आरआयटी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. अलीकडेच आरआयटीने अमेरिका, यु. के, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, तैवान आणि जर्मनी या देशातील एकूण 45 विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. भविष्यात आरआयटी मध्ये शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढणार असून ही गरज लक्षात घेता आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यार्थी वसतिगृहाची वास्तू आरआयटीने उभारली आहे.
यावेळी नितीन गडकरी यांचे आरआयटी महाविद्यालयात आगमन झाल्यानंतर ते लगेचच उदघाटनस्थळी जातील. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि निमंत्रित लोकांशी संवाद साधतील. यावेळी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य व राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, महाविद्यालयाच्या रजिस्ट्रार सारिका पाटील, डॉ. के. एस. पाटील, कॉम्युटर सायन्सचे विभाग प्रमुख डॉ. सचिन पाटील, डॉ. अमोल अडमुठे, प्रा. वैभव धोत्रे, उपस्थित होते.